सिंदखेडराजा : स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ४२६ व्या जन्मोत्सवानिमित्त येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊंच्या जन्मस्थळी असलेल्या प्रतिमेची शुक्रवारी पहाटे अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महापूजा केली. सकाळचे आल्हाददायक वातावरण, सनईचे मंजूळ सूर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने राजवाड्यातील वातावरण चैतन्यमय झाले होते. माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजाराे शिवप्रेमींनी सिंदखेडराजात हजेरी लावली़
मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ वंदना
मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व सेवा संघाच्या विविध शाखांच्या वतीने १६ जोडप्यांकडून जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी जिजाऊ वंदना घेण्यात आली. जिल्हा समन्वयक सुभाष कोल्हे, अॅड. राजेंद्र ठोसरे, शिवाजी जाधव, ज्योती जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
नगर परिषदेने केली फटाक्यांची आतषबाजी
स्थानिक नगर परिषदेच्या वतीने अध्यक्ष सतीश तायडे यांनी सपत्नीक महापूजा केली. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, सर्वपक्षीय नगरसेवक या वेळी उपस्थित होते. दरम्यान, राजवाड्यात पालिकेच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.ऐतिहासिक वेशभूषा आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य राजवाड्यात जसजसा सूर्य उदयास येऊ लागला तसतसे विविधरंगी पारंपरिक पेहरावातील महिला पुरुषांच्या वावराने राजवाडा परिसर विविध रंगांनी न्हाऊन गेला होता. ऐतिहासिक वेशभूषेतील शालेय विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कुणी छत्रपती साकारले तर कुणी जिजाऊ आईसाहेबांचा पेहराव केला. सावित्रीबाई, अहिल्याबाई, इतिहास काळातील महिलांचा पेहरावदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
सीईओ आल्या पारंपरिक वेशात
जिल्हा परिषदसारख्या महत्त्वपूर्ण विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या महिला आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी महापूजा केली जाते. या वर्षी सीईओ भाग्यश्री विसपुते यांनी पारंपरिक वेशात जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन केले. या वेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, सिध्देश्वर काळुसे, गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेनिकर, पंचायत समितीतील अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.