- अनिल गवई
खामगाव : शेलोडी रस्त्यावरील एक हजार झाडं गायब झाल्याचे वृत्त ताजे असतानाच, शेलोडी-तित्रंव रस्त्यावर देखील एक हजाराच्यावर झाडे चोरीला गेल्याचे दिसून येते. कागदोपत्री झाडं दाखवून मोठ्या भ्रष्टाचार करण्यात आला. त्यामुळे सामाजिक वनीकरणाकडून लागवड केलेली हजारो झाडं ‘गायब’असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हिरवळ वाढविण्याच्या उद्देशाने तसेच पर्यावरण रक्षणासाठी विविध योजना अंमलात आणल्या जातात. यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात येतो. मात्र, वृक्ष लागवड, वृक्षांचे संगोपन आणि संवर्धनाची मुख्य धुरा असलेल्या सामजिक वनीकरण विभागाकडूनच शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येते. खामगाव-शेलोडी रस्त्यावरील एक हजार झाडं गायब असल्याची धक्कादायक बाब गेल्याच आठवड्यात उघडकीस आली. त्यानंतर लागलीच खामगाव तालुक्यातील शेलोडी-तित्रंव रस्त्यावरील हजारो झाडं चोरीला गेल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दरम्यान, सामाजिक वनीकरण विभागाच्या बड्या अधिकाºयांकडून या प्रकार दाबण्यासाठी पुढाकार घेतल्या जात असल्याचे दिसून येते. लागवड अधिकाºयांची या प्रकाराला मूक संमती असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात होत आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी खामगाव येथील लागवड अधिकाºयांशी संपर्क साधला असता, आपल्या कार्यकाळातील विषय नसल्याचे सांगत त्यांनी माहिती देण्याचे टाळले. चौकट...
तित्रंव येथील झाडंही नाविण्यपूर्व योजनेचीच!
खामगाव तालुक्यातील शेलोडी-खामगाव रस्त्यांवर सामाजिक वनीकरण विभागाकडून २०१५-१६, २०१६-१७, २०१७- १८ या आर्थिक वर्षांत नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत एक हजार वृक्ष रोपट्यांची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे शेलोडी- तित्रंव रस्त्यावरही तितकीच झाडं लावण्यात कागदोपत्री लावून देयक काढण्यात आली. मात्र, आता ही झाडं अस्तित्वात नसल्याने शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आल्याचे दिसून येते.
झाडांसोबतच पाणी दिल्याचेही पैसे हडपले!
खामगाव-शेलोडी आणि शेलोडी- तित्रंव रस्त्यावर झाडं लागवडीसाठी शासन निधीचा अपहार करण्यात आला. त्याचप्रमाणे ही झाडं जगविण्यासाठी पाणी दिल्याचे भासवित आणखी रक्कमेचा अपहार करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी संगनमताने हा घोळ केल्याची चर्चा आहे. सामुहिक भ्रष्टाचारातून शासनाला तीस लक्ष रुपयांचा फटका बसल्याची ओरड होत आहे.
साईट खडकाळ असल्याचा फार्स!
खडकाळ साईट असल्याचा फार्स सामाजिक वनीकरण विभागाकडून आता निर्माण केल्या जात आहे. दरम्यान, नाविण्यपूर्ण योजनेतून लागवड करण्यात आलेल्या दोन हजारावर झाडांसाठी जेसीबीच्या सहाय्याने खड्डेही खोदण्यात आले. यासाठी जेसीबीचे ४३ हजार ५०० रुपयांचे देयक काढण्यात आले. तसेच या खड्ड्यांमध्ये चांगली गाळाची माती, शेणखत आणि तत्सम बाबींसाठीही खर्च करण्यात आला. तरीही या रस्त्यावरील हजारो झाडं जगली नाहीत. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
खामगाव- शेलोडी आणि शेलोडी- तित्रंव या दोन्ही साईटसंबधीत वृक्ष लागवडीची माहिती घेतली जाईल. साईट रेकॉर्डची तपासणी देखील करण्यात येईल. अनियमिता आढळून आल्यास संबंधितांची अजिबात हयगय केली जाणार नाही.
-एस.ए.पार्डीकर, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण, बुलडाणा.