अंढेरा : हिंगणघाट येथील तरुणीला जाळल्याची घटना ताजी असतानाच अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावातील तरुणीला अॅसिड टाकून जाळण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. पिडीतेच्या तक्रारीवरुन अंढेरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास मंगळवारी पहाटे अटक केली आहे. रईस शेख हबीब शेख असे आरोपीचे नाव असून तो २२ वर्षांचा आहे. पिडीत १८ वर्षीय युवती गावापासून जवळ असलेल्या शहरात कॉम्प्यूटर क्लास करते. त्यानिमित्त दररोज बसने येणे जाणे करते. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता ती क्लासवरुन घरी परतली. आरोपी रईस शेख हबीब शेख तिच्या पाळतीवर होता. युवती बसमधून उतरताच त्याने तिचा पाठलाग केला. जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न करुन वाईट उद्देशाने हात पकडला. झाल्या प्रकाराची कुठेच वाच्यता करायची नाही अशी दमदाटी दिली. तसेच अॅसिड टाकून जाळण्याची धमकी दिली. आरोपीच्या धमकीमुळे युवती प्रचंड घाबरली. मदतीसाठी तिने आरडाओरड केली. तत्काळ पिडीतेची आई व इतर दोघे जण घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहताच आरोपीने तिथून पळ काढला. पिडीतेसह तिच्या कुटूंबियांनी रात्री अंढेरा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. नजीकच्या ग्रामीण रुग्णालयत तरुणीची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. दरम्यान मंगळवारी पहाटे ५.१७ वाजता आरोपीस अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपी अंढेरा पोलिसांच्या कस्टडीत असून दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एसडीपीओंची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी भिमानंद नलावडे यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली. पिडीतेचा जबाब नोंदवून तपासाच्या दृष्टीने सूचना दिल्या. यावेळी ठाणेदार नरेंद्र ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील हजर होते. याप्रकरणी विनयभंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.