अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून परिसरात झालेल्या गुन्हेगारी घटनांचे काही धागेदोरे सापडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रकरणाचा अधिक तपास करण्याच्या दृष्टीने अटक करण्यात आलेल्या तीनही संशयितांची नावे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केली नाही.
स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मेहकर उपविभागात २५ मे रोजी रात्री गस्तीवर होते. दरम्यान मेहकर परिसरात एक वाहन संशयास्पद स्थितीत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनात असलेल्या तिघांची चौकशी केली तेव्हा संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी रॉड, मोबाईल व काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. त्यावरून पोलिसांनी वाहनासह तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, हेड कॉन्स्टेबल अताउल्लाह, नायक पोलीस कॉन्स्टेबल गजानन आहेर, लक्ष्मण कटक, भारत जंगले, युवराज मुळे, गजानन गोरले यांच्या पथकाने केली.