मलकापूर : मलकापूर, मोताळा परिसरात वन्यप्राण्यांच्या लाखो रुपये किंमतीच्या अवयवांची तस्करी करणाºया तिघांना अमरावती वनपरिक्षेत्र विभागीय अधिकारी मनोज खैरनार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बसस्थानक परिसरात मुद्देमालासह रंगेहात पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली.मलकापूर, मोताळा वनपरिक्षेत्रात खवल्यामांजर वन्यप्राण्यांची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती अमरावती वनपरिक्षेत्र विभागाला मिळाली. या प्राण्याचे खवले लाखो रुपयांना विकले जातात. त्यामुळे एक टोळीच या कामात सक्रिय आहे. यासंदर्भात प्राप्त गुप्त माहिती वरुन अमरावती वनपरिक्षेत्र विभागीय अधिकारी मनोज खैरनार यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा वनसंरक्षक रणजित गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.कोंडावार, वाईल्ड लाईन क्षेत्र संरक्षक आकाश सारडा, मुकेश जवारकर, रोशन वरुळकर, जिवन डिकार, आडे आदिंच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी दुपारी साध्या गणवेशात त्या वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या खरेदीबाबत बोलणी केली. खवल्यामांजर या प्राण्याचे खवले लाखो रुपयात विकली जातात. त्यामुळे वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिताफीने सापळा करून बसस्थानक परिसरात तिघांना मुद्देमालासह अटक केली. त्यापैकी एकाने पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यालामलकापूर येथील सिनेमा रोडवर ताब्यात घेतले व रस्त्यावरच चांगलाच धडा शिकविला. त्यानंतर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. भर रस्त्यावर मारहाण करून पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आरोपी सर्व परिचित असल्याने व अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकरवी वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करून लाखो रुपये कमावणारे रँकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:11 AM