लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपिटीमुळे शेतकर्यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरू केलेल्या हमी भाव केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रुपयांचे चुकारे थकीत असल्यामुळे शेतकर्यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह समारंभ मोडण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. शासकीय हमी भाव केंद्रावर तूर विकण्यासाठी लोणार तालुक्यात गेल्या महिनाभरात अंदाजे ५ हजार शेतकर्यांनी ऑनलाइन नोंदणी केली; मात्र तूर खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने अनेक शेतकर्यांना, व्यापार्यांना तूर विकून पैसे मोकळे करून घेतले. उशिरा तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकरी मात्र अधिकच दुखावला गेला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी शासकीय खरेदी केंद्रावर मूग, उडीद व सोयाबीन शेतकर्यांनी मोठय़ा अपेक्षेने विकला. शासकीय हमी भाव मिळेल आणि पैसेही लवकर मिळतील, या अपेक्षेने शेतकर्यांनी विकलेल्या शेतमालाचे मात्र अजून पैसे मिळालेले नाहीत. तर शेतकर्यांजवळ असलेली जमापुंजी संपलेली असून, मुलीच्या विवाहापासून तर शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने तगादा लावल्याने ३ ते ५ टक्के व्याजदराने सावकाराकडून कर्ज घेतले जात आहे. नाफेड खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांनी नगदी पैसे मिळण्यासाठी कमी भावात व्यापार्यांना माल विकत आहेत.
७१९ शेतकर्यांची आहे समस्यालोणार तालुक्यातील ७१९ शेतकर्यांचा ४ हजार ९८0 क्विंटल उडीद नाफेडने खरेदी केला आहे, तर २ कोटी ६८ लाख ९२ हजार रकमेपैकी ५३४ शेतकर्यांना १ कोटी ८७ लाख ९४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र उडिदाचे अजून, ८0 लाख ९८ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत, तसेच ३९८ शेतकर्यांनी २ हजार १९३ क्विंटल मूग नाफेडला विकला. १ कोटी २२ लाख २५ हजार रुपये रकमेपैकी ३३४ शेतकर्यांना १ कोटी ६ लाख ५२ हजार रुपये देण्यात आले; मात्र अजूनही ६४ शेतकर्यांचे १५ लाख ७३ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत.