ज्ञानगंगा अभयारण्यात मेंढ्या चारणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, वन्यजीव विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे हे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांसह खामगाव वन्यजीव परिक्षेत्रातंर्गत गस्तीवर गेले होते. दरम्यान, पिंपळगाव नाथ भागात काही मेंढपाळ चराई करीत असल्याचे या गस्ती पथकाच्या १० ऑगस्ट रोजी दुपारी निदर्शनास आले. त्यावेळी सबंधितांना हटकण्यात आले असता त्यांनी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. त्यामध्ये वन्यजीव विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना मेंढपाळांनी मारहाण सुरू केल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहत हवेत पिस्तुलाचा एक फायर केला. त्यामुळे तेथील दहा ते १२ मेंढपाळ पळून गेले.
दरम्यान, त्यांच्या काही साथीदारांना याची माहिती मिळाल्यानंतर जवळपास ४० ते ४५ जणांचा जमाव पुन्हा गस्ती पथकाच्या अंगावर आला. त्यांच्यावर लाठ्या, काठ्या, शस्त्रे असल्याने वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभीर्य पाहता दीपेश लोखंडे यांनी रिव्हॉल्व्हरमधून पुन्हा हवेत दोन फायर केले. त्यामुळे हल्ला करणारे घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला असून, वन्यजीव विभाग बोराखेडी पोलिसांनाही या संदर्भात एक पत्र देणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
--विशिष्ट आवाज करून बोलावले
प्रारंभी पळून गेलेल्या १० ते १५ व्यक्तींनी विशिष्ट आवाज करून त्यांच्या मदतीसाठी आणखी काहीजणांना पिंपळनाथ भागात बोलावले. अवैधरीत्या संरक्षणात वनक्षेत्रात मेंढ्यांची चराई करण्याचा प्रघातच अलीकडील काळात पडला आहे. यापूर्वीही ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांवर असे हल्ले झालेले आहेत. त्यामुळे एखाद्या वेळी असा प्रसंग उद्भवल्यास आरोपी विशिष्ट आवाज करून त्यांच्या सहकाऱ्यांना मदतीस बोलावत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
----
अभयारण्यात अवैध मेंढी चराईचे प्रमाण अधिक आहे. ही मंडळी स्थानिक वन कर्मचाऱ्यांचेही ऐकत नाहीत. वन कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकल्यास ते वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येतात. १० ऑगस्टला गस्तीवर असताना हे मेंढपाळ अभयारण्यात दिसले. त्यांना हटकण्याचा गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. पण, ते अंगावर धावून गेल्याने वन कर्मचाऱ्यांना वाचविण्याकरिता हवेत तीन फायर करावे लागले. फायरनंतर ते मेंढपाळ घटनास्थळावरून पळून गेले.
- दीपेश लोखंडे,
वनपरिक्षेत्र अधिकारी