मलकापूर (बुलढाणा) : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने प्रेयसीसह पतीनेच सुपारी देऊन त्याच्या पत्नीची हत्या घडवून आणली. नव्या मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पनवेल पूर्व रेल्वेस्थानकालगत १५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता विवाहितेवर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या करण्यात आली. त्या प्रकरणात मलकापूरच्या गोपनीय शाखेसह मुंबई पोलिसांच्या पथकाने मलकापुरातील तिघांना रविवारी रात्री अटक केली. प्रेयसीने त्यासाठी ३ लाख रुपयांची सुपारी या तिघांना दिली होती.
रोहित राजू सोनुने (२२) रा. शिवाजीनगर, मलकापूर, दीपक दिनकर चोखंडे (२५), रा.बेलाड ता. मलकापूर व त्यांचा साथीदार पंकज नरेंद्रकुमार यादव (२६) जौनपूर, उत्तरप्रदेश या तिघांना अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ सप्टेंबर रोजी नवी पनवेल पूर्व रेल्वे स्थानकातील सिडको पार्किंगलगच्या एटीएमजवळ रात्री ९.३० वाजता प्रियंका देवव्रतसिंग रावत (२९) या विवाहितेचा गळा चिरून खून करण्यात आला. पोलीस तपासात अनैतिक संबंधातून खून झाल्याचे समोर आले होते. मृतक महिलेचा पती देवव्रतसिंग याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याने त्याला प्रेयसीला सोबत रहायचे होते. मात्र, त्याची पत्नी संबंधात अडसर होती. त्यामुळे थेट प्रेयसीनेच प्रियकराच्या पत्नीचा काटा काढण्याची तयारी केली. त्यासाठी तिने मलकापूरच्या रोहित राजू सोनोने याला संपर्क केला.
त्याच्या साथीदारांना घेऊन तो मुंबईत पोहचला. तिथे प्रियकराच्या पत्नीचा काटा काढण्यासाठी ३ लाख रुपयांची सुपारी तिने तिघांना दिली. त्यातील २ लाख रुपये आधी उर्वरित हत्या केल्यानंतर देण्याचे ठरले. आरोपींनी विवाहितेवर पाळत ठेवली. कामावरून घरी परतताना पनवेल रेल्वे स्थानकालगतच तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
पोलिसांनी तिला रूग्णालयात नेले. तसेच प्रकरणाचा तातडीने उलगडा करून मृतक विवाहितेचा पती देवव्रतसिंग याला प्रेयसीसह अटक केली. त्यांनी हत्येची सुपारी दिल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांचे पथक रविवारी सकाळी मलकापुरात पोहचले. मलकापूर पोलिसांच्या डीबी पथकाने त्यांना मदत केली. सोबतच दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बेलाड येथे सिनेस्टाईल पाठलाग करून तिघा आरोपींना पकडले. त्यांना नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई ठाणेदार विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनानुसार डीबी पथकाचे सपोनि सुखदेव मोरखडे, संतोष कुमावत, राठोड, डागोर, सलीम बर्गे यांनी मुंबईच्या पथकासोबत केली.
मृत महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर याप्रकरणी मृत महिलेच्या सासऱ्याने १६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता खांदेश्वर पोलिसात तक्रार दिली होती. त्यावेळी अज्ञात आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पनवेल तालुक्यातील विहिघर येते राहात असलेल्या राजेंद्र कुंदनसिंग रावत यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांची मोठी सून प्रियंका देवव्रतसिंग रावत (२९) हिचा रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान पनवेल पूर्व रेल्वेस्थानकातील सिडको पार्किंगसमोर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केल्याचे म्हटले. प्रियंका सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. ठाण्यातील एका कंपनीत ती डिजिटल मार्केटिंगचे काम करत होती.
पतीला घेतले तातडीने ताब्यात -घटनेच्या काही वेळातच खांदेश्वर पोलिसांनी मृत प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत याला खांदेश्वर पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले होते. तो ॲमेझॉन कंपनीत कार्यरत होता. त्यानंतर त्याच्या प्रेयसीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापुरातील तिघांना अटक करण्यात आली.