- नीलेश जोशी
बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातामध्ये ३०४ लोकांचा मृत्यू झाला असून २०१७ च्या तुलनेत अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यां चे प्रमाण आणि अपघातांची संख्याही वाढली असल्याचे स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात महिन्याकाठी सरासरी ५४ अपघातामध्ये २५ व्यक्ती मृत्यू पावत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात सध्या ३० रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. त्यासंदर्भाने माहिती संकलीत केली असता उपरोक्त बाब स्पष्ट झाली. एकीकडे नववर्षापासून जिल्ह्यात हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याउपरही गतवर्षीची अपघातांची संख्या व त्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या ही जिल्ह्यात रस्ते प्रवास किती सुरक्षीत आहे, याचे वास्तव समोर आणणारा आहे. परिणामस्वरुप खासदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांचेही गांभिर्य यामुळे वाढले आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात ८५ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, चिखली-मेहकर, खामगाव-देऊळगाव राजा, शेगाव ते पंढरपूर या दिंडी मार्गाचा बुलडाणा जिल्ह्यातील भागात सध्या वेगाने रस्त्यांची कामे चालू आहे. यामध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली, वाहनांच्या तंदुरुस्तीचा अभाव, रस्ता दुरुस्तीदरम्यान कंत्राटदारांकडून न होणारे नियमांचे पालन, वाहन चालकांचा दोष यासह अन्य कारणामुळे जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा जिल्ह्यातून गेलेला सुमारे ८५ किलोमीटर लांबीचा रस्ता तर अलिकडील काळात मृत्यूचा सापळाच बनला आहे. या मार्गावर दररोज कोठेना कोठे अपघात होत असल्याचे चित्र आहे.
२०१७ च्या तुलनेत मृत्यूचे प्रमाणात वाढ
बुलडाणा जिल्ह्यातील रस्ते अपघातामध्ये २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून २०१७ मध्ये २७१ व्यक्ती ६०६ अपघातामध्ये मृत्यू पावले होते तर २०१८ मध्ये ६४८ अपघातामध्ये ३०४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सातत्याने बुलडाणा जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत असून गेल्या दहा वर्षामध्ये खामगाव-देऊळगाव राजा हा रस्ता किलर ट्रॅक ठरला आहे. आता त्या पाठोपाठ मलकापूर ते खामगाव दरम्यानचा एनएच क्र. सहा किलर ट्रॅक ठरत आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसोबतच नव्याने होणारी रस्त्याची कामे तातडीने पूर्णत्वास नेण्याची गरज निर्माण झाली आहे.