चिखली : चिखली परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ५ व ६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. ५ सप्टेंबर रोजी सोमठाणा फाटानजिक मेटॅडोर व दुकाची यांच्यात झालेल्या अपघातात पिता-पूत्र जागीच ठार तर आज ६ सप्टेंबर रोजी चिखली बुलडाणा मार्गावरील पळसखेड फाटानजिक एका अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर असे की, स्थानिक संभाजी नगर मधील रहिवासी गणेश नारायण अवसरमोल वय ४५ व त्यांचा एकुलता एक बार वर्षीय मुलगा बुध्दभूषण अवसरमोल हे दोघे त्यांचे मुळगाव गोमेधर ता.मेहकर येथून दुकाची क्र.एम.एच.२८ एस.२३९५ ने चिखलीकडे येत असताना सोमठाणा फाटानजिक चिखलीहून उंद्रीकडे जाणार्या मेटॅडोर क्र. एम.एच.0४ बी.यु.९१६८ ने जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात गणेश अवसरमोल व बुध्दभूषण अवसरमोल हे दोघे पिता-पूत्र जागीच ठार झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मॅटेडोर चालकाविरूध्द कलम २७९, ३0४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेला २४ तास उलटत नाही तोच तालुक्यातील किन्होळा येथील अनंता भास्कर शेंडे वय ३0 वष्रे व महेंद्र भगवान भांबळे वय २६ वष्रे हे दोघेजण एम.एच.२८ ए.ई.८३६१ क्रमांकाच्या दुचाकीवरून चिखलीहून किन्होळाकडे जात असताना चिखली-बुलडाणा मार्गावरील पळसखेड फाटानजिक एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकी चालक अनंता भास्कर शेंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर महेंद्र भांबळे गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस धडक देणारे वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीस उपचारार्थ रूग्णालयात हलविण्यात आले आहे. पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत. या अपघाताच्या घटनांमुळे रस्ता सुरक्षा धोक्यात आली आहे.
दोन अपघातात तीन ठार ; एक गंभीर
By admin | Published: September 07, 2014 12:21 AM