बुलडाणा : राज्य शासनाने हरित महाराष्ट्राच्या पायाभरणीसाठी महत्त्वाकांक्षी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार १ जुलै रोजी जिल्ह्यात तब्बल तीन लाखाच्यावर वृक्षारोपण करण्यात आले. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, खासगी व्यवस्थापनांची कार्यालये, खुली जागा, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, आयटीआय, वन विभागांचे आगार आदी ठिकाणी प्रामुख्याने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण मोहिमेला जिल्ह्यामध्ये लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते. जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी आज सर्वप्रथम जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर कार्यालयाच्या परिसरात नगराध्यक्ष टी.डी अंभोरे, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक सेडाम, उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, तहसीलदार दीपक बाजड आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तहसील कार्यालयातही जिल्हाधिकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अपर तहसीलदार नवृत्ती गायकवाड, नायब तहसीलदार अजित शेलार, सोळंके, सोनवणे आदी उपस्थित होते.
तीन लाखांवर वृक्षांची लागवड
By admin | Published: July 02, 2016 1:19 AM