कोल्हापूर : दहावीची परीक्षा, निकालाच्या धाकधुकीनंतर अकरावी प्रवेशाची धावपळ संपवून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज, बुधवारी कॉलेजच्या कॅम्पस्मध्ये पहिले पाऊल टाकले. पाऊस सुरू असताना देखील त्यांनी कॉलेजची वेळ चुकविली नाही. विवेकानंद कॉलेज, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, कमला महाविद्यालय, गोखले कॉलेज, महावीर महाविद्यालय आदींसह सर्वच महाविद्यालयांमध्ये वेळेवर वर्ग सुरू झाले. महाविद्यालयांमधील आजचा दिवस ओळखी करून घेण्यातच गेला. सकाळी सात वाजल्यापासूनच विद्यार्थी, विद्यार्थिनींची गर्दी होऊ लागली. महाविद्यालयाची शिस्त, वेगळेपण, नियम, आदींबाबत माहिती देण्यासाठी विवेकानंद कॉलेज, कॉमर्स कॉलेजमध्ये स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात प्राचार्य, प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. वर्गाची माहिती, तासांचे वेळापत्रक आणि नव्या मित्र-मैत्रिणींची ओळख करून घेतल्यानंतर कँटिन, कट्ट्यांवर विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या गप्पांचे फड रंगले होते. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरीत भिजत अनेकांनी ग्रंथालय, कँटिनसह कॉलेज कॅम्पस्मध्ये बिनधास्तपणे फेरफटका मारला. काहीजण नवे मित्र बनविण्यात मग्न होते. वर्गातील तास पूर्ण झाल्यानंतर काहींनी आपल्या राहिलेल्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली. अशा पद्धतीने अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कॉलेजच्या पहिल्या दिवसाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांचे स्वागत करणारे मजकूर अनेक महाविद्यालयांच्या नोटीस बोर्ड, वार्ताफलकांवर झळकले होते. दरम्यान, ‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ हे लक्षात घेऊन कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आपला प्रभाव पाडण्यासह इतरांचे लक्ष वेधण्यासाठी अधिकतर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी तयारी केली होती. विद्यार्थिनी मॅचिंग ड्रेसवर मॅचिंग सँडल, जीन्स-कुर्ता अशा कपड्यांमध्ये दिसून आल्या, तर जॅकेट, जीन्स, टी शर्ट, शॉर्ट शर्ट, फॉर्मल लुकमध्ये विद्यार्थी आले होते.
बुलडाणा जिल्ह्यातील तीन नगरपालिका अध्यक्ष अविरोध
By admin | Published: July 16, 2014 11:53 PM