अनेकांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन - इंजेक्शन, औषधांचा तुटवडा आहे. अशावेळी एकमेकांना मदत करण्याची, आधार देण्याची गरज असल्याने गावोगावी कोरोना आयसोलेशन सेंटर उभे राहावे, अशी संकल्पना रविकांत तुपकर यांनी मांडली होती. किन्होळा येथे त्यांनी बैठका घेऊन नागरिकांना पुढाकार घेण्यासाठी प्रवृत्त केले आणि किन्होळ्यात लोकसहभागातून सुसज्ज असे कोविड आयसोलेशन सेंटर सुरु झाले. हा किन्होळा पॅटर्न राज्यभर चर्चेत आला. येथे रुग्ण दाखल झाले होते. यापैकी तीन रुग्णांनी काेरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यामुळे या रुग्णांना १५ मे रोजी सुटी देण्यात आली. सुट्टी होणारे हे या सेंटरमधील पहिले रुग्ण ठरल्याने त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. रविकांत तुपकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन या रुग्णांचा सत्कार करण्यात आला. रविकांत तुपकर यांची संकल्पना, ग्रामस्थांचा पुढाकार आणि लोकसहभाग यातून कोरोनाच्या या संकटावर आपण गावातच मात करु शकतो, हे सिद्ध झाले. या सेंटरमध्ये मिळालेल्या सुविधांबाबत एकंदरीत सर्व वातावरणाबाबत सुटी झालेल्या रुग्णांनी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. अनिल साळोख, डॉ.अनिल पांढरे, डॉ. भाग्यश्री खेडेकर, डॉ. दीपाली महाजन, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. आकाश सदावर्ते, डॉ. स्वप्नील अनाळकर, राजू बाहेकर, वसंता जाधव, नंदू पाटील, सुनील बाहेकर, सतीश बाहेकर, शेख आरिफ, सतीश जाधव आदी उपस्थित होते.
तुपकरांचे कोरोनाग्रस्तांसोबत भोजन
किन्होळ्यातील कोविड आयसोलेशन सेंटर सुरु झाल्यानंतर या सेंटरची जबाबदारी आपल्यावर आहे, या भावनेतून रविकांत तुपकर दररोज सकाळी चार तास आणि सायंकाळी चार तास या सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसोबत वेळ घालवत आहेत. शिवाय गावात जनजागृती निर्माण करणे, नागरिकांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करुन घेणे, लसीकरण करुन घेणे या कामात तुपकरांनी स्वत:ला जुंपून घेतले. या कार्यव्यस्ततेत जेवणासाठी घरी जाणे शक्य होत नाही त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांसोबतच आपला डबा खाऊन तुपकर या रुग्णांचे मनोबल वाढविण्याचेही काम करीत आहेत.