मोताळा (बुलढाणा) : दुचाकीने जात असलेल्या तिघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना १२ ऑगस्ट राेजी संध्याकाळी रोहिनखेड ते धामणगाव बढे मार्गावर रोहिनखेड शिवारात घडली आहे. यामध्ये दुचाकीवरील तिघे जखमी झाले आहेत, यापूर्वीही परिसरात बिबट्याने हल्ले केल्याने बिबट्याची सर्वत्र दहशत पसरली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
तालुक्यातील सारोळा मारोती येथील गणेश मापारी, श्रीकृष्ण आसने आणी आशा आसने असे तिघेजण १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी दुचाकीने रोहिनखेड येथून सारोळा मारोती येथे जात होते, दरम्यान रोहिनखेडच्या पुढे काही अंतरावर रोहिनखेड शिवारात अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला, या हल्ल्यात दुचाकी चालक गणेश मापारी यांच्या पायाला बिबट्याचे नख लागून दुखापत झाली आहे, तर दुचाकीचा तोल गेल्याने दुचाकी खाली पडून कृष्णा आसने आणी आशा आसने हे जखमी झाले आहेत.
यापूर्वी रोहिनखेड येथील मो. सुफियान, पुरुषोत्तम राजस, कय्युम शाह थळ येथील सचिन सारोळकर यांच्यावर बिबट्याने हल्ला करीत त्यांना जखमी केले होते, या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. यावेळी घटनेचे गांभीर्य पाहता वनविभागाच्या रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. यावेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने रोहिनखेड शिवारात पाहणी करण्यात आली आहे परंतु बिबट्या दिसून आला नाही.