बुलडाणा : अजिंठा-बुलडाणा मार्गावर मढ फाट्यानजीक महानुभाव आश्रमा समोर गिट्टीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये तीन जण ठार झाले एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात १४ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातातील दोन मृतक हे अैारंगाबाद जिल्ह्यातील पाणवडोद परिसरातील असून एक मृतक हा बुलडाणा जिल्ह्यातील आहे.
गिट्टीची वाहतूक करणारा टिप्पर (एमएच-२८-बी-७५९४) चालक राहुल गेंदलाल बारेला (२२, रा. चिंचखेड बु. रा.मुक्ताईनगर) हा वाढोण्यावरुन दहिदकडे जात असताना दुचाकीला (एमएच-२०-सीडी-०७३०) त्याच्या वाहनाची जबर धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीवरील दुचाकीवरील ज्ञानेश्वर सुरोशे (४०, रा. पानवडोद, ता. सिल्लोड, जि. अैारंगाबाद), वरद अनंता वैद्य (११,कोलवड), अमर रामेश्वर जाधव (१५, रा. शिवणी, जि. अैारंगाबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर वनिता ज्ञानेश्वर सुरोशे (३५, रा. पानवडोद, ता. सिल्लोड) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले.पती-पत्नीचे भाचे अपघातात ठार
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपस्थित नातेवाईंकानी दिलेल्या माहितीनुसार, कोलवड माहेर असलेल्या वनिता सुरोशे या माहेरावरुन सासरी पानवडोदला पती, वरद अनंता वैद्य (भाचा), अमर रामेश्वर जाधव (मृतक ज्ञानेश्वर सुरोशे यांचा भाचा) यांच्यासह दुचाकीने जात होते. दरम्यान दुपारी त्यांच्यावर काळाने घाला घातला.
ज्ञानेश्वर सुरोशेंचे पार्थिव घटनास्थळी पडूनअपघातानंतर परिसरातील प्रत्यक्षदर्शीनी अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात आणण्याचे प्रयत्न केले. तर यामधील ज्ञानेश्वर सुरोशे हे जागीच ठार झाल्याने त्यांचा मृतदेह जागेवरच पडून होता. घटनेच्या अर्ध्या तासानंतर धाड पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला तर तब्बल १ ते सव्वा तासाने जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन आरोपी टिप्पर चालकास ताब्यात घेण्याची कारवाई केली.
रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा टाहो...
अपघातानंतर रुग्णालयात मृतकांचे नातेवाईक येत असतानाच अनेकांना बाहेरच थांबवून घडलेल्या अपघाताची माहिती दिली जात होती. यावेळी महिला नातेवाईकांची संख्या जास्त असताना रुग्णालय परिसरात आरोळ्या, किंकाळ्यांनी अनेकांचे ऱ्हदय हेलावून सोडले होते.