कॅशबॅक मेसेजद्वारे फसवणूक वाढली
बुलडाणा : तुम्हाला ३,९९९ रुपयांचा कॅशबॅक मिळाला असून नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा, असे म्हणून शेतकऱ्याची फसवणूक केल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. सध्या कॅशबॅक मेसेजद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येते.
पेरूच्या बागेत मिरचीची लागवड
धामणगाव धाड : येथील शेतकरी मधुकर जंजाळ यांनी आपल्या शेतातील पेरूच्या बागेत आंतरपीक म्हणून मल्चिंग पेपरवर ठिबक सिंचनद्वारे मिरचीची लागवड केली आहे. सध्या या भागात भाजीपालावर्गीय पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
अपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
मेहकर : तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्पाचे काही काम अपूर्ण आहे. मात्र, त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रह्मपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते.
लिंक फेलमुळे बँकेचे कामकाज प्रभावित
डोणगाव : अनेक ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील व्यवहार लिंक फेलच्या समस्येमुळे प्रभावित झाले आहेत. परिणामी, अनेक ग्राहक व शेतकऱ्यांना आपल्या व्यवहारासाठी बँकेच्या पायऱ्या झिझवाव्या लागत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची निकड लक्षात घेता तातडीने समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
डाळींचे भाव कडाडले
किनगाव राजा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच महागाईने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. खाद्यतेल तेजीत असतानाच डाळींचेही दर कडाडले असल्याने दररोजच्या जेवणातून डाळ गायब झाल्याचे चित्र आहे.
दमदार पावसाने शेतकरी सुखावला
जानेफळ : परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरीवर्ग सुखावला असून, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीलासुद्धा सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पेरणीच्या घाईमुळे बाजारपेठेत पुरेसे बियाणे उपलब्ध नसल्याने कृषी केंद्रचालकांनी शेतकऱ्यांची लूट चालविली असून, अव्वाच्या सव्वा भावाने बियाणांच्या थैलीची विक्री होत आहे. कृषी विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
सुलतानपूर-वेणी रस्त्याची दुरवस्था
सुलतानपूर : येथून जवळच असलेल्या सुलतानपूर-वेणी रस्त्याची पहिल्याच पावसाने दुरवस्था झाली आहे. पहिल्या पावसामध्येच हा रस्ता संपूर्णपणे चिखलमय झाला असून, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
लसीकरणाविषयी मार्गदर्शन
माेताळा : कोरोना या आजारासोबतच लसीबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या वतीने ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुटुंब सर्वेक्षण अनुप्रिता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, सीमा गोरे यांनी केले.
खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त
डाेणगाव : परिसरात गत काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. थाेडा जरी पाऊस आला, तरी वीजपुरवठा खंडित करण्यात येताे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शेतरस्त्यावर साचला चिखल
जानेफळ : मागील काही वर्षांत जानेफळ-सोनारगाव या पाणंद रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी अनेकवेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे. डांबरीकरण होणार म्हणून या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे दानपत्रदेखील दिले आहे. मात्र, या रस्त्यावर पहिल्याच पावसात चिखल साचला आहे.
पाडळी परिसरात आराेग्य सर्वेक्षणास प्रारंभ
मासरूळ : प्राथमिक आरोग्य केंद्र, पाडळीअंतर्गत असलेल्या सर्व खेड्यांमध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कीटकनाशक विशेषत: डासांमार्फत प्रसारित होणारे हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आदींचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
देऊळगाव कुंडपाळ : परिसरात ८ जून राेजी झालेल्या जाेरदार पावसामुळे शेततलाव फुटल्याने जमीन खरडून गेली. विठ्ठल कैलास सरकटे, कैलास माणिकराव सरकटे, अनिल प्रकाश सरकटे, विलास गणेशराव सरकटे यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही.