लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: जळगाव जामोद येथील बाधित एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संग्रामपूर येथील डॉक्टर कुटुंबियातील बारापैकी तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. येथील डॉक्टर कुटुंबियांतील अकरा व एक घरात काम करणारा असे बारा लोकांना तपासणीसाठी कोविड रुग्णालय शेगाव येथे पाठवण्यात आले होते. रविवार २१ जून रोजी सकाळी यापैकी नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात एक ३८ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुषांसह २ वर्षीय मुलीचा समावेश आहे. काही दिवसापूर्वी शेगाव येथे लग्न समारंभ पार पडला. त्या लग्नसमारंभात संग्रामपूर येथील डॉक्टर कुटुंबीयांच्या संपर्कात जळगाव जामोद येथील एक डॉक्टर कोरोना बाधित आल्याने या डॉक्टर कुटुंबियांना हायरिक्समध्ये क्वारंटीन करण्यात आले. त्यांचे रिपोर्ट दि. २१ रोजी प्राप्त झाले. यात तीन जण पॉझिटिव्ह आल्याने संग्रामपुरात खळबळ उडाली. आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांच्या घराजवळील परीसर सील करून कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. डॉक्टर कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या हायरीक्स मधील व्यक्तींचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मयूर वाडे यांनी दिली आहे.
पातूर्ड्यात एक महीला पॉझिटिव्ह
संग्रामपूर तालुक्यातील पातूर्डा येथील नऊ जणांना कोविड रुग्णालय शेगाव येथे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट रविवारी रोजी प्राप्त झाले आहे. नऊपैकी आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ३७ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. पातुर्डा येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १६ वरून वाढून १७ झाली आहे.