लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : शहरातील मुख्य बाजारपेठेतील तीन दुकानांना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून त्यात दुकानांचे जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.शहरातील लोणी रस्त्यावर असलेल्या एका दुकानातून धूर निघत असल्याचे सायंकाळी काही नागरिकांच्या लक्षात आले. दरम्यान, नेमका प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची तेथे गर्दी होत असतानाच आगीने रौद्ररूप धारण केले. लगतच्या किराणा, जनरल स्टोअर्स व एका कापड दुकानालाही ही आग लागली. आगीची माहिती लोणार पालिका व पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर अग्निशमन दलासही तेथे पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली. तसेच पोलिसांनी आगीचे गांभीर्य पाहता गर्दी केलेल्या नागरिकांना घटनास्थळावरून हटविले. या आगीत जवळपास ४० लाख रुपयांचे या तिन्ही दुकानांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
लोणारमधील तीन दुकानांना आग, ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 11:45 IST