लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : अन्न व औषध प्रशासन बुलडाणा कार्यालयाच्या अधिकार्यांनी शुक्रवारी नांदुरा शहरातील खवा विक्रेत्यांच्या दुकानांवर धाड टाकत चार जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यामुळे खवा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अन्न सुरक्षा अधिकारी सं.ल.सिरोसिया व गोपाल माहोरे यांच्या पथकाने १३ ऑक्टोबर रोजी पहाटे रेल्वे स्टेशन जवळ भेट देऊन खवा विक्रेत्यांची तपासणी केली. खव्यांचे 0४ नमुने विविध विक्रेत्यांकडून घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले. दिवाळीच्या अनुषंगाने खव्याची मागणी जास्त असल्याने उलाढाल वाढते. त्यामुळे भेसळीची शक्यता नाकारता येत नाही. नांदुरा ही पूर्वीपासूनच खव्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. गावातील किरकोळ उत्पादक घरात खवा तयार करून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरसुद्धा पुरवठा करतात.शुक्रवारी नांदुरा स्टेशन परिसरात खवा उत्पादक विक्रेते सकाळी सदर खवा विक्री पुरवठा करण्यासाठी जमलेले असताना अन्न सुरक्षा अधिकार्यांनी छापा मारला. यावेळी विविध खवा विक्रेत्यांकडील खव्याची आयोडिनची चाचणी केलेली असून, 0४ नमुने विश्लेषणासाठी घेतलेले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी ओळखीच्या तसेच नियमित व्यवसाय करणार्या व्यक्तीकडूनच खवा खरेदी करावा. तसेच खव्याचा वास येत असल्यास किंवा काही शंका आल्यास सदर विक्रेत्याकडून खवा कमी भावात खरेदी करु नये, तसेच याबाबत काही तक्रार असल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले. यासोबतच उपस्थित खवा विक्रेते व उत्पादकांना आवश्यक प्रबोधन करून कार्यशाळासुद्धा घेण्यात आली आहे.
खवा विक्रेत्यांची धावपळअन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी नांदुरा रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकला. या छाप्याची माहिती मिळाली असता खवा विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. खवा विक्रेत्यांसोबतच निकृष्ट दर्जाच्या मिठाईची विक्री करणारे विक्रेते अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर असल्याचे समजते. सणासुदीच्या दिवसात मिठाईची मागणी लक्षात घेता भेसळ करणार्यांच्या संख्येतही वाढ होते. या पार्श्वभुमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना करून खबरदारी घेतल्या जात आहे.
दिवाळीचे फराळ बनविणार्यांची होणार तपासणी सध्या सर्वत्र दिवाळीच्या फराळाची दुकाने लागली आहेत. दिवाळीचा फराळ बनविताना अनेकदा अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बनविण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात येते. त्यामुळे यानंतर दिवाळीचे फराळाचे नमुने तपासण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी सांगितले.