लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: रेती घेऊन जाणार्या टिप्परने धडक दिल्यामुळे काळी-पिवळीतील आठ जण जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान डोणगाव- मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली. जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, त्यापैकी तिघांना मेहकरला हलविण्यात आले.मालेगावकडे रेती घेऊन जाणार्या टिप्पर क्रमांक एम. एच. ३७ जे ७७२२ ने समोरून येणार्या एम. एच. २८ एच. १७४४ क्रमांकाच्या काळी-पिवळीला धडक दिली. यामध्ये प्रवासी जीपमधील मुस्तफा खान साहेब खान, मोहन जुनघरे, युसूफ खान दिलदार खान (सर्व रा. डोणगाव), गोपाल खंडारे (रा. नेतन्सा), वसंता दुराजी जाधव (लोणी गवळी), अलीम खान सलीम खान, केतन ठाकरे, भगीरथी शिंदे (रा. द्रुक बोरी) यांचा जखमीत समावेश आहे. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.
अज्ञात वाहनाची धडक; विद्यार्थी जखमीबुलडाणा: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान तालुक्यातील ढालसावंगी येथे घडली. दरम्यान, जखमीवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ढालसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत इयत्ता चवथीत शिकणारा शेख सुबान शेख इब्राहीम हा विद्यार्थी दुपारच्या सुटीत घराकडे जात होता. भरधाव वेगात जाणार्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळताच शाळेचे शिक्षक व नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.