बुलढाणा : शाळा सुटल्यानंतर गावाकडे जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑटोला रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील टिप्परने जबर धडकदिल्याने चार वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर सात विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी एका गंभीर जखमी मुलाला अकोला येथे तर इतर सहा विद्यार्थ्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार मोताळा तालुक्यातील शेंबा येथील सरस्वती कॉन्व्हेंट मध्ये जवळा बाजार, बेलोरा येथील काही लहान मुले शिक्षण घेत आहेत.
२१ सप्टेंबर रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर लहान विद्यार्थ्यी ऑटोद्वारे आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान शेंबा ते जवळा बाजार मार्गावर समोरून रेती घेऊन येणाऱ्या भरधाव टिप्परने ऑटोला जबर धडक दिली. यात पवन उमेश मुकूंद (४), गौरी शिवाजी ढोकणे (५), सुपेश निवृत्ती वाकडे (५), सानवी भूषण गावंडे (५), सार्थक पुरुषोत्तम काकर (३), आनंद भोजने (४ सर्व रा. जवळा बाजार, ता. नांदुरा) तसेच समर्थ सोपान वाकडे (५, रा. बेलुरा, ता नांदुरा) जखमी झाले. त्यांना तत्काळ बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु पवन मुकुंद याला गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. २१ सप्टेंबर दुपारी हा अपघात घडला. याप्रकरणी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बोराखेडी पोलीस स्टेशन मध्ये सुरू होती.