साखरखेर्डा,बुलढाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका शेतकऱ्याने अंबाशी फाट्यावरील एका शेतात विषारी औषध प्राशन करून आत्यहत्या केली. ही घटना १५ मे रोजी उघडकीस आली. ज्ञानेश्वर सिताराम बुंधे (५३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
तांदुळवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर बुंधे हे १४ मे रोजी दुपारी साखरखेर्डा येथून येतो म्हणून घरुन निघाले होते. परंतू रात्री ते घरी परत आलेच नाहीत. मुलांनी फोन लावून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता फोनही लागत नव्हता. १५ मे रोजी सकाळी काही व्यक्तींना त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यांनी तांदूळवाडी येथे संपर्क साधून उपरोक्त घटनेची माहिती दिली.
मृत शेतकऱ्यावर भारतीय स्टेट बँक , आणि फायनान्स कंपनीचे कर्ज होते. त्यांच्या पत्नीच्या नावे सुध्दा कर्ज काढलेले आहे. २०१२ साली काढलेले कर्ज माफीत बसले नाही. सतत व्याज वाढत गेल्याने कर्ज भरणेही कठीण झाले होते. ७ ते ८ एकर शेती असताना दोन मुलांच्या शिक्षणाचा व्याप सांभाळून प्रपंच तालवणे त्यांना कठीण झाले होते. याच विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.