मेहकर : आगाराच्या भंगार एस. टी. बसेसमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील अंजनीवरून मेहकर जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या एसटी बसचे शनिवारी अचानक टायर फुटल्याने या विद्यार्थींनीची शाळा बसमध्येच भरली. परंतू चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
एसटी महामंडळाच्या मेहकर आगारात जवळपास ८० एसटी बसेस आहेत. यातील अनेक बसेस जुनाट झालेल्या आहेत. अंजनी ते मेहकर मानव विकास मिशनची एसटीबस (क्रमांक एम. एच. १४. बी.टी. ४५३७) विद्यार्थी घेऊन जात होती. ही बस अंजनीवरून मेहकरसाठी निघाली असता अंजनीवरून दोन किलोमीटर पुढे येताचा बसचे पुढील टायर फुटल्याने मोठा आवाज झाला. समोरचा टायर पंक्चर झाल्यामुळे एसटी बसचे नियंत्रण करणे सर्वात जास्त अवघड असते. परंतू चालकाने पसंगावधान राखत वेळीच बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. दररोज अनेक विद्यार्थी अंजनी बुद्रुककडून मेहकरला मानव विकास मिशनच्या बसनेच जातात. परंतू शाळेच्या वेळेतच बसचे टायर बसल्याने या विद्यार्थ्यांची शाळा बसमधेच भरली. यापूर्वी सुद्धा अंजनी बुद्रुक गावात विद्यार्थ्यांना मानव विकास मिशनची बस मिळत नसल्याने एसटी बससमोर रस्ता रोको केला होता.