बुलढाणा : स्वाभीमानी शेतकरी संघटनेत अंतर्गत पातळीवर सध्या सुरू असलेली धुसपूस कायम असून रविकांत तुपकर हे पुण्यात झालेल्या संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीस उपस्थित रहाले नाही. परिणामी त्यांना नैसर्गिक न्यायाच्या भूमिकेतून पुन्हा एक संधी बाजू मांडण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. दुसरीकडे चळवळीचा झेंडा घेऊनच आपण विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दबाव गटाप्रमाणेच शेतकऱ्यांचा दबावगट तयार करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यापासून स्वाभीमानी शेतकरी संघटनेमध्ये रविकांत तुपकर विरुद्ध स्वाभीमानीचे शिर्षस्थ नेते राजू शेट्टी यांच्यामध्ये असलेला संघर्ष चर्चेत आला आहे. शेट्टी गेल्या आठवड्यात जिल्ह्यात आल्यानंतरही तुपकर यांना संग्रामपुरातील मोर्चात बोलावण्यात आले नव्हते. त्यानंतर हा संघर्ष जगजाहीर झाला होता.
दुसरीकडे रविकांत तुपकर यांनी ८ ऑगस्ट रोजी पुण्यात झालेल्या संघटनेच्या शिस्तपालन समिती समोर म्हणणे मांडण्यापेक्षा तेथे न जाण्याची भूमिका घेतली होती. संघटनेच्या नेतृत्त्वाची कार्यपद्धती आणि भूमिका यावर असलेल्या आक्षेपाबाबत वारंवार आपण सांगितले. पुन्हा तोच मुद्दा उदृक्त करण्यात अर्थ नसल्याचे तुपकर म्हणाले. सोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दबावगट कार्यरत आहेत, त्याच पद्धतीने विदर्भ, मराठवाडा, खान्देशात आपण सोयाबीन, कापूस उत्पदाक शेतकऱ्यांचा एक दबावगट तयार करून चळवळीच्या झेंड्याखाली महाराष्ट्रात कार्यरत राहू, असे स्पष्ट करत आपण कुठल्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नसल्याचे तुपकर म्हणाले.
नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीकोणातून पुन्हा संधी - शेट्टीशिस्तपालन समितीची पुण्यात बैठक झाली. रविकांत तुपकर त्यास अनुपस्थित होते. त्यांच्या अपरोक्ष निर्णय घेणे हे नैसर्गिक न्यायालाय धरूण होणार नाही. त्यामुळे त्यांना १५ ऑगस्टपर्यंत पुन्हा बाजू मांडण्यासाठी एक संधी देणार आहोत, असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा मा. खा. राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले आहे. त्यासाठी पाच जेष्ठांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. यात संघटनेचे राज्याध्यक्ष, प्रा. पोफळे, उच्चाधिकार समितीचे प्रमुख संदीप जगताप, सतिष काकडे व अन्य एक जण अशा पाच सदस्यांची ही समिती राहील. १५ ऑगस्टनंतर ही समिती अनुषंगीक विषयावर योग्य तो निर्णय घेईल. दरम्यान ८ ऑगस्टच्या बैठकीत तुपकरांनी केलेल्या आरोपांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचेही शेट्टी म्हणाले.