बुलडाणा, जि. २५- मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अँट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवार, २६ सप्टेंबर रोजी बुलडाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिवसभर संपूर्ण जिल्ह्यातच मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याकरिता जय्यत तयारी करण्यात आली. सोमवारी मोर्चाच्या दिवशी अतिशय शिस्तीत निघणार्या या मोर्चाचे नेतृत्व जिजाऊंच्या लेकी करणार आहेत. महिला भगिनीच मोर्चाच्या अग्रस्थानी राहणार आहेत. मोर्चाचे प्रमुख केंद्र जयस्तंभ चौक राहणार असून, या ठिकाणी मोठा स्टेज आहे. स्टेजवर फक्त अकरा मुलीच राहतील आणि त्या मुली शेतमजूर कुटुंबातील असतील. याच मुली जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार आहेत. जयस्तंभ चौक, संगम चौक, स्टेट बँक चौक, मलकापूर रोडवरील चावडी चौक, या परिसरात केवळ महिलाच राहणार आहेत. तर जिजामाता व्यापारी संकुलात बुलडाणा शहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या मुली जमा होणार आहेत. या मोर्चात दहा हजार शिस्त स्वयंसेवकांची प्रत्येक घटनेवर बारीक नजर राहणार आहे. राज्यात इतर ठिकाणी झालेल्या मोर्चाप्रमाणेच हा मोर्चासुद्धा भव्य व संपूर्णपणे शिस्तबद्ध झाला पाहिजे, याची दक्षता समितीसह सर्वांच्यावतीने घेण्यात येत आहे. समितीने दहा हजार स्वयंसेवकांची चमू तयार केली आहे. संपूर्ण मोर्चाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे. या मोर्चात पोलिसांचीही कडक सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. महिला, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची मोर्चात बहुसंख्येने उपस्थिती राहणार आहे. मोर्चानंतर शहरात कचरा राहू नये, यासाठीची विशेष काळजीही घेण्यात आली आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील काही खासगी शाळा, महाविद्यालयांनी सोमवारी सुटी जाहीर केली आहे. विविध समाजाचा पाठिंबा मराठा क्रांती मोर्चाला विविध समाजांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये लोणार येथील मुस्लीम समाज, जैन समाज, नाभिक समाज, अग्रवाल समाज, माहेश्वरी समाज, राजस्थानी समाज, दिगंबर जैन संघ, तेरापंथी जैन संघ, धाड येथील बौद्ध समाजाने पाठिंबा दिला आहे. १0 हजार शिस्तसेवक देणार सेवा! मोर्चात १0 हजार शिस्तसेवक वेगवेगळ्या जबाबदार्या सेवा म्हणून पार पाडणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता शरद कला महाविद्यालयात नाव नोंदणी झाली. त्यानंतर रात्री ८ वाजेपयर्ंत प्रशिक्षण झाले. त्यानंतर शरद कला महाविद्यालय, राजर्षी शाहू इंजिनिअरिंग कॉलेज, विदर्भ विकास महाविद्यालय, मुकुल वासनिक विधी महाविद्यालय, जिजामाता महाविद्यालय, जनशिक्षण संस्थान, गर्दे वाचनालय, मदर टेरेसा नसिर्ंग कॉलेज आदी ठिकाणी जेवण व मुक्काम. २६ सप्टेंबरला पहाटे पाच वाजता शिस्तसेवकांना डेमो दिला जाईल. सकाळी सात वाजता ओळखपत्र व ड्रेस वाटप आणि ८ वाजेपासून त्यांना विविध ठिकाणी नियुक्त केले जाणार आहे. एसटी बसच्या मार्गात बदल बुलडाणा येथे मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन २६ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणारा जनसमुदाय बघता वाहतूक सोयीच्या दृष्टीने बुलडाणा बस आगाराच्यावतीने बदल करण्यात आले आहेत. चिखली मलकापूर, मलकापूर-चिखली, औरंगाबाद-धाड- बुलडाणा-मलकापूर, मलकापूर-बुलडाणा-धाड- औरंगाबाद मार्गात बदल करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा, चिखली, धाड, अजिंठा जाणार्या व येणार्या बसेस, चारचाकी व जडवाहनांना बुलडाणा येथे न येऊ देता पर्यायी मार्गाने वळविणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (१) अन्वये सह कलम ३६ अन्वये २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १0 वाजेपर्यंत वरील मार्गांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
आज एकवटणार सकल मराठा समाज
By admin | Published: September 26, 2016 2:56 AM