संग्रामपूर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सामाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्ग अनुभव कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून वन्यजीव प्रशासन सज्ज झाले आहे. २३ मे रोजी रात्री चंद्राच्या लखलख प्रकाशात अभयारण्यात वास्तव्यास असलेले वन्य प्राणी कागदावर उतरणार आहेत.
सातपुडा पर्वत रांगेतील सदाबहार वन परिसरात विविध वन्य प्राणी तसेच दुर्मिळ पक्षांसह सह विविध प्रजातींच्या पक्षांची किलबिलाट पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. निसर्ग अनुभव कार्यक्रम २७ ठिकाणी पार पडणार असून यासाठी मचान उभारण्यात आले आहे. अभयारण्यात नैसर्गिक ७ तर कृत्रिम २४ असे एकूण ३१ पाणवठे आहेत. रात्री मचान वर बसून प्राणी प्रेमींच्या उपस्थितीत प्राणी गणना पार पडणार आहे. प्रत्यक्ष नजरेत दिसून येणाऱ्या वन्यजीवाची गणना महत्त्वाची ठरणार आहे. या प्राणी गणनेसाठी १९ वनरक्षक, ४९ वनमजूर, ५ वनपालसह २० (शिकाऊ) प्रशिक्षणार्थी वनरक्षक कर्तव्यावर राहणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान गतवर्षी २०२३ मध्ये ३ वाघांसोबत ३ बिबट, १२ अस्वल, ५४ नील गाय, ३७ सांबर, १५ भेडकी, ६४ गवा, ४८ रान डुक्कर, ५१ लंगूर, ११६ माकड, २० रान कोंबडी, ३ रान मांजर, ८५ मोर, ५ ससा, १ सायाळ असे एकूण ५१७ वन्य प्राण्यांची नोंद झाली होती. गुरूवारी रात्री चंद्राच्या लखलख प्रकाशात पानवठ्यांवर प्रत्यक्षात किती वन्यप्राण्यांचे दर्शन होणार, हे स्पष्ट होणार आहे.
"अंबाबरवा अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रम रात्री चंद्राच्या लखलख प्रकाशात २७ ठिकाणी पार पडणार आहे. त्याअनुषंगाने दोन दिवस जंगल सफारी बंद ठेवण्यात आली आहे. विविध ठिकाणचे १० प्राणी प्रेमी वन्यप्राण्यांच्या गणनेत सहभागी झाले आहेत", असं वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) सुनील वाकोडे म्हणाले.