योगेश फरपट लोकमत न्युज नेटवर्कखामगाव : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. मात्र प्रशासनातील भ्रष्ट वृत्तीचे अधिकारी कागदावरच शौचालय बांधून मलिदा लाटत असल्याचे वास्तव बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात आहे. तालुक्यातील गटग्रामपंचायत इसरखेड अंतर्गत पिंप्री कोळी, इसरखेड येथे फक्त ४० शौचालय असून तेही खासगी बांधकाम केलेले आहेत. ८० टक्के लोक आज सुद्धा उघड्यावर शौचालयास जात आहे. शौचालय नसतांना सुद्धा ग्रामपंचायत हागणदारी मुक्त करण्यात आली आहे. हा शौचालय तपासणी करणारा अधिकारी कोण आहे? कोणाच्या शौचालयाचा सर्व्हे केला. व हागणदारी मुक्त गाव हे कोणत्या आधारावर जाहिर केले आहे. आॅनलाईन यादीमध्ये खोटे शौचालय दाखवून अनुदानाचा पैसा कुणी हडप केला आहे. आॅनलाईन यादीमध्ये ज्या लोकांची नावे आहेत. त्यांच्याकडे शौचालय नसतांना त्यांच्या नावावर अनुदान काढण्यात आले आहे. परंतू लाभ धारकांना एक पैसा सुद्धा मिळाला नसल्याचे संबधितांचा आरोप आहे. अनुदानाची रक्कम कुठे गेली व गाव हागणदारीमुक्त कसे झाले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इसरखेड, पिंप्री कोळी, नवीन इसरखेड या तिन्ही गावात झालेल्या शौचालयाची तपासणी करण्यात यावी. शासनाने ठरवून दिलेले अनुदान लाभधारकांना मिळाले की नाही याची सुद्धा चौकशी करणे गरजेचे झाले आहे. ग्रामसभाही कागदावरच!इसरखेड ग्रामपंचायतीमध्ये २०१३ पासून नोटीस लावून व दवंडी देवून एकही ग्रामसभा झाली नाही. कोरमअभावी सभा रद्द दाखवून निर्णय घेण्यात आले.
पैसे वाटपही रेकॉर्डलाच!शौचालय अनुदानाची रक्कम सुद्धा वाटप केल्याचे आॅ़नलाईन यादीत दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र संबधितांनी ही रक्कम मिळाली नसल्याचे वास्तव आहे.
इथे झाले घोळइसरखेड, नवीन इसरखेड, पिंप्री कोळी येथील नागरिकांचे वैयक्तीक शौचालयाचे खोटे कागदपत्र तयार करून बील काढण्यात आले. खर्च झालेल्या बाबीची कोेणतीही शहानिशा गटविकास अधिकारी यांनी केली नाही. आॅनलाईन अहवालानुसार २०१४ मध्ये २४, २०१५ मध्ये ८ लाभधारकांना, २०१६ मध्ये २६ लाभधारकांना लाभ देण्यात आल्याची नोंद आहे. परंतू त्यांच्या पैकी ३४ नागरिकांकडे शौचालय नाही. तरीही अनुदान दिल्याची नोंद आहे. परंतू त्यांना रक्कम अदा करण्यात आली नाही. ही रक्कम कुणाच्या खिशात गेली याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
इसरखेडसह नवीन इसरखेड व पिंप्री कोळी येथील शौचालय घोेटाळ्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. - ए.टी.तायडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जि.प.बुलडाणा
शौचालय घोटाळ्याची चौकशी करण्यात अधिकाºयांकडून दिरंगाई केली जात आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला गटविकास अधिकाºयांनी केराची टोपली दाखवली आहे. - गिताबाई नारायण कांडलकर (ग्रामपंचायत सदस्या, इसरखेड)