- अनिल गवई
खामगाव : तालुक्यातील शासकीय गोदामामध्ये तूरदाळ उपलब्ध नाही. परिणामी, खामगाव तालुक्यातील शीधापत्रिका धारकांच्या जेवणातून तूरदाळीचे ‘वरण’ गायब असल्याची चर्चा आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही समस्या उद्भवल्यामुळे तालुक्यातील शीधापत्रिकाधारक त्रस्त झाले असून, रास्त भाव दुकानदार वेठीस धरल्या जात असल्याचे दिसून येते.
सार्वजनिक वितरण प्रणालीतंर्गत तालुक्यातील १५८ स्वस्त धान्य दुकानावरून तालुक्यातील शीधापत्रिका धारकांना गहू, तांदूळ, साखर, तूरदाळीसह अन्य धान्य वितरीत करण्यात येते. मात्र, खामगाव तालुक्यातील शासकीय गोदामात गेल्या १५-२० दिवसांपासून तूरदाळ उपलब्ध नाही. धान्य गोदामातूनच पुरवठा होत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांकडूनही तूरदाळीचे वाटप बंद आहे. तुरदाळीसाठी शीधापत्रिकाधारक स्वस्त धान्य दुकानांमध्ये वारंवार चकरा मारून त्रस्त झालेत. शीधापत्रिका धारक आणि स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये वारंवार खटकेही उडत आहेत. परिणामी, अनेक रास्त भाव दुकानदार वेठीस धरल्या जाताहेत. तालुक्यातील शीधा पत्रिका धारकांना वितरीत करण्यासाठी सुमारे ३५० ते ४२५ क्विंटल तूरदाळीची आवश्यकता भासते. मात्र, या महिन्यात तूरदाळ उपलब्धतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राशन दुकानदारांकडून चालानचा भरणा!
शासकीय गोदामात उपलब्ध धान्याच्या आधारे पासींगद्वारे चालानचा भरणा करण्यात येतो. मात्र, खामगाव तालुक्यातील गोदामात धान्य उपलब्ध नसतानाही पुरवठा विभागाकडून चालान भरून घेण्यात आले आहे. ‘डीलीव्हरी आॅर्डर’ विनाच चालान भरण्यात आल्याने रास्त दुकानदार कोंडीत सापडल्याचे दिसून येते. पुरवठा विभागातील सावळ्या गोंधळामुळे रास्त भाव दुकानदारांसोबतच शीधापत्रिका धारकही त्रस्त झाले आहेत.
शासकीय गोदामात तूरदाळ उपलब्ध नसताना, खामगाव पुरवठा कार्यालयाकडून तूरदाळीच्या पैशांचा भरणा करण्यासाठी वेठीस धरले जात आहे. या आधीदेखील ज्वारी, बाजरी आणि इतर धान्यांचेरास्त भाव दुकानदारांचे पैसे अडकले आहेत. या रक्कमेसंदर्भात पुरवठा विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आता तूरदाळीच्या बाबतीतही असे घडू नये, अशी अपेक्षा रास्तभाव दुकानदारांची आहे.
- रवि महाले, तालुकाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना, जि. बुलडाणा.
शासकीय गोदामात तूर दाळ उपलब्ध नाही. तूरदाळीचा ‘डीओ’अद्याप व्हायचा आहे. या महिन्यात तूर दाळ उपलब्ध झाली की, लवकरच वितरीत केली जाईल. जानेवारीचे तूरदाळीचे वितरण प्रंलबित आहे.
- व्ही. डब्ल्यू. भगत, वितरण अधिकारी, पुरवठा विभाग खामगाव.