ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि. १८- जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रावर जवळपास ४५ हजार क्विंटलपर्यंंत तुरीची खरेदी झाली आहे. परंतु शासकीय खरेदी केंद्रावर तुरीची चाळणी केल्यानंतर मोजणी होत असून, पैशासाठीसुद्धा प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी अडचणी येत असल्याने तूर उत्पादकांच्या हातावर तुरी मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांंनंतर पहिल्यांदाच शेतकर्यांना तुरीचे उत्पादन समाधानकारक झाले. पेरणीच्या वेळेला तुरीचे भाव १0 हजार प्रति क्विंटलपेक्षा जास्त होते मात्र; नवीन तूर बाजारात येताच तुरीचे दर निम्यापेक्षाही कमी झाले आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या शेतकर्यांनी आपली तूर नाफेडच्या खरेदी केंद्राकडे नेण्यास सुरुवात केली. नाफेडचे तुरीचे दर प्रति क्विंटल ५0५0 रुपये आहेत. खासगी बाजारात हेच दर ३८00 ते ४५00 रुपयांपर्यंंत आहेत. यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे तूर नेणार्या शेतकर्यांची संख्या वाढली. मात्र तेथेही अनेक अडचणी शेतकर्यांना येत आहेत. यावर्षी तुरीचे उत्पादन चांगले आहे, मात्र भाव मिळत नसल्याने शेतकरी तूर विक्री करण्यासाठी हतबल झाले आहेत. खुल्या बाजारात तुरीचे दर घसरल्याने शेतकरी तूर विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रांकडे वळले. शासकीय खरेदी केंद्रावर तूर मोजण्यापूर्वी शेतकर्यांच्या तुरीची चाळणी केली जाते. तुरीची विक्री केल्यानंतर शेतकर्यांना रोख पैसे मिळत नाहीत. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, शेगाव, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, संग्रामपूर या सहा केंद्रावर जवळपास ४५ हजार क्विंटलपर्यंंत तुरीची विक्री झाली आहे. परंतु यातील अध्र्यापेक्षा अधिक शेतकर्यांना अद्याप विकलेल्या तुरीचे पैसे मिळाले नाहीत. तूर विक्रीनंतर पैशासाठी कित्येक दिवस शेतकर्यांना प्रतीक्षा करावी लागते. शासनाने शेतकर्यांच्या तुरीला योग्य भाव मिळावा, या हेतूने सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रावर शेतकर्यांनी तूर विक्रीसाठी आणल्यानंतर अनेक शेतकर्यांना प्रतवारीमुळे तूर विक्री करताना अडचणी येत आहेत. तसेच खासगी व्यापारीदेखील तूर खरेदी करत नसल्याकारणाने केवळ प्रतवारीमुळे शेतकर्यांना विक्रीसाठी आणलेली तूर परत न्यावी लागते. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या तुरीच्या वाहतुकीसाठी नाहक पैसे मोजावे लागतात. शासकीय तूर खरेदी केंद्रावर त्याचा जबर फटका शेतकर्यांना बसत आहे.बुलडाण्यातील तूर वाशिम जिल्ह्यात!बुलडाण्यात १३ कृषी उत्पन्न बाजार समित्या असून, याठिकाणी तूर विक्रीनंतर लगेच पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांना तूर विक्री करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकरी वाशिम जिल्ह्यात तूर विक्रीसाठी नेत आहेत. त्यांना हातोहात चेक मिळत असल्याने अनेक शेतकरी वाशिम व कारंजा येथे तूर विक्रीसाठी नेत आहेत.
तूर उत्पादकांच्या हातावर ‘तुरी’!
By admin | Published: February 19, 2017 2:14 AM