बुलडाणा: कंत्राटदाराचे थकित देयक काढून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनास ३ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. दीपक शंकरराव गोरे (४२) असे लाच स्वीकारणाऱ्या आरोपीचे नाव असून मुळचा तो वाशिम शहरातील गणेश पेठमधील रहिवाशी आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
बुलाडणा येथील प्रचार व प्रसिद्धी कंत्राटदार असलेल्या एकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांचे शासकीय कामकाजाचे थकीत असलेले देयक वरिष्ठांना सादर करून काढून देण्यासाठी सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील ४२ वर्षीय अव्वल कारकून (वर्ग ३) दीपक शंकरराव गोरे याने कंत्राटदारास एक लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपी दीपक शंकर गोरे हा सध्या सिंदखेड राजा येथेच राहत होता. तो मुळचा वाशिम शहरातील गणेशपेठमधील रहिवाशी आहे. दरम्यान, दोन मार्च रोजी पडताळणीत लाच मागितल्याचे समोर आले होते. त्यानुषंगाने तीन मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी तक्रारदाराकडून लाचेचा ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी दीपक शंकरराव गोरे यास रंगेहात पकडले. सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लाच स्वीकारताना ही कारवाई एसीबीच्या पथकाने केली. या कारवाईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलिस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, विजय मेहेत्रे, विनोद लोखंडे, चालक मधुकर रगड, अर्शीद शेख यांनी सहभाग घेतला होता. त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड (अमरावती परीक्षेत्र) आणि अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी हे करीत आहेत. दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन एसीबीचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी यांनी केले आहे.