लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सराई : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ३० आॅगस्ट रोजी सैलानीत भाविकांचा जनसागर उसळला होता. या यात्रेदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.पोळा अमावस्येच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २९ आॅगस्ट रोजीच भाविक भारताच्या कानाकोपऱ्यातून खासगी वाहनाने सैलानीत दाखल झाले होते. सकाळीच भाविकांनी सैलानी बाबांच्या झिºयावर जाऊन आंघोळ केली. यानंतर सैलानी बाबांच्या समाधीवर गलफ चादर चढवून हजारो भाविकांनी दर्शन घेतले.या ठिकाणी फुले, शेरनी व गलफची दुकाने थाटली होती. जांभळीवाले बाबा, वाघजाई, गवळी बाबा, सुलताने बाबा या ठिकाणीसुद्धा भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, दरवर्षी पोळा अमावस्येला भाविकांची प्रचंड गर्दी असते. दरवर्षी या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळते.मात्र चिखली-हातणी-सैलानी रस्ता कोरडा असूनही चिखली आगाराने सैलानीसाठी एसटी बसेस सोडल्या नाहीत. त्यामुळे भाविकांना खासगी वाहनांचा शोध घ्यावा लागला. खूप वेळ वाहनाची वाट पाहावी लागल्याने चांगलीच गैरसोय सहन करावी लागली असल्याचे दिसून आले.सैलानी येथील यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुभाष दुधाळ व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी यांनी चोख पोलिस बंदोबस्त पार पाडला.रस्त्याच्या खोदकामामुळे वाहनधारकांची कसरतसैलानी रस्त्याचे खोदकाम झालेले असल्यामुळे याठिकाणी दर्शनासाठी येत असताना वाहनधाकरकांना चांगलीच कसरत करावी लागली. यात्रेपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. याचा फटका भाविकांनादेखील बसला असून या सर्व परिस्थितीमुळे त्यांची चांगलीच गैरसोय झाली.
सैलानीत उसळला भाविकांचा जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 1:26 PM