अझहर अलीसंग्रामपूर : विविध ठिकाणांहून जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राणी दर्शन देऊन आकर्षित करीत आहेत. जंगल सफारीदरम्यान बुधवारी दुपारी एकाच वेळी तब्बल पाच वाघ निदर्शनास पडले.
बुधवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यानपासून सुरू झालेल्या जंगल सफारीदरम्यान छत्रपती संभाजीनगर, पुणे, चिखली, जळगाव जामोद या शहरांतील असंख्य पर्यटकांना पट्टेदार वाघांनी दर्शन दिले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत आदिवासीबहुल अतिदुर्गम भाग असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील अंबाबरवा अभयारण्यात बुधवारी दुपारच्या जंगल विविध शहरांतील असंख्य पर्यटकांची जंगल सफारीला सुरुवात झाली.
दरम्यान, वसाली येथील छत्रपती शिवाजी महाराज जंगल सफारी गेटपासून अंबाबरवाकडे जाणाऱ्या सफारी रस्त्याने पाटा पाणी भागात पर्यटकांना एका पाणवठ्यात निवांत बसलेला वाघ दिसला. त्याच ठिकाणी काही अंतरावर चार वाघ निदर्शनास पडले. यावेळी पाणवठ्यात बसलेल्या वाघाचे छायाचित्र पर्यटकांनी टिपले आहे. या पर्यटकांना वाघासह इतर वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला. अभयारण्यात वन्यप्राणी दर्शन देऊ लागल्याने पर्यटकांमध्ये कुतूहल वाढले आहे. यावेळी विविध शहरांतील दुपारच्या वेगवेगळ्या जंगल सफारीदरम्यान पर्यटकांसोबत मार्गदर्शक आरीफ केदार, सुमित पालकर, अजय सुरत्ने, अशोक पालकर, सागर पालकर उपस्थित होते. अंबाबरवा अभयारण्य १५ हजार ८३९.७५ हेक्टर क्षेत्रफळात व्यापलेला आहे. सातपुडा पर्वताला निसर्गाची देण असून, ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. देशभरातून येथे पर्यटक जंगल सफारीसाठी येथे येत आहेत.
अंबाबरवा अभयारण्यात बुधवारी दुपारच्या जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना ५ वाघ दिसून आले आहे. एकाचवेळी ५ वाघांचे दर्शन पहिल्यांदा घडले आहे. अंबाबरवा अभयारण्यात जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघोबाशिवाय इतर वन्यप्राणी दिसून येत आहेत. -सुनिल वाकोडे, वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), सोनाळा, ता. संग्रामपूर