लोणार: सरोवरामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीने परिसर समृद्ध आहे. सरोवराला जगभरातील पर्यटक भेट देतात. लोणारला वैज्ञानिक, ऐतिहासिक, पौराणिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, पर्यटकांनी एक-दोन दिवस राहतो म्हटले, तर येथे सुविधांचा अभाव आहेे. त्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होत आहे. येथे पर्यटक भरपूर येतील, पण सुविधांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी सामूहिक पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारने पर्यटकांसाठी पॅकेज देत, ट्रॅव्हल्स कंपन्यांना सवलत देण्याची गरज आहे. जागतिक ‘अ’ दर्जाचे पर्यटन केंद्र असल्याने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याची ताकद या वैभवात आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात पैसा मिळूनही येथील विकास रखडला असल्याचे दिसून येते. लोणार सरोवर पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटकांची गर्दी होते. मात्र, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयापर्यंत साध्या-साध्या सुविधा येथे नाहीत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. लोणारच्या विकासाकरिता शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी लोणार सरोवर संवर्धन व विकास आराखड्याची बैठक घेऊन १०७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला; परंतु निधीच्या तुलनेत विकासकामांची गती शून्य असल्याने अपेक्षित विकास झालेला नाही. शासनासह विविध संस्था, नागरिक यांनी पर्यटकवाढीसाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दरवर्षी लोणार महोत्सव व्हावा..
लोणार सरोवराचा विकास व्हावा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता शहर आणि परिसरातील नागरिकांनी फेब्रुवारी २००६ मध्ये लोकवर्गणीतून लोकोत्सव केला. २००७ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयामार्फत लोणार महोत्सव झाला. २०१६ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनामार्फत लोणार महोत्सव झाला. या वेळी परदेशी पर्यटक उपस्थित होते. तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी केलेल्या नियोजनातून स्थानिक कलाकारांना संधी दिल्याने हा महोत्सव चांगलाच गाजला. शासनाने दरवर्षी लोणार महोत्सव घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
पावसाळ्यात लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने जगभरात लोणारबद्दल आकर्षण वाढले. वैज्ञानिक, ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व असलेल्या या सरोवराला चांगले दिवस येतील. स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा. कोरोना काळात संपूर्ण पर्यटन बंद असल्यामुळे गाईड लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने काही आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.
शैलेश सरदार, गाईड लोणार सरोवर.