- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने प्रतिबंधित बियाण्याचा वापर रोखण्यासाठी खामगाव येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उमरा येथे घेतलेल्या बियाणे नमुन्यात एचटीबीटी अंश सापडल्याने आता संबंधित आरोपी जगन्नाथ गणपत बगाळे, चालकावर पर्यावरण कायद्यानुसार कारवाई करण्याचे पत्र तालुका कृषी अधिकारी जी. बी. गिरी यांनी दिले आहे. दरवर्षी पेरणी केलेले बियाणे निकृष्ट निघाल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जातात. तसेच खतांमध्येही आवश्यक ते गुणवत्तेचे घटक नसल्याचेही तपासणीतून पुढे येते. त्याशिवाय, प्रतिबंधित बियाणे, किटकनाशकांची विक्री, साठा करण्याचेही प्रकार घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या पथकांनी काटेकोरपणे तपासणी करण्याचा आदेश कृषी आयुक्तांनी दिला होता. तालुका कृषी अधिकारी गिरी यांना तालुक्यातील उमरा येथे दोन व्यक्तींकडून बियाणे विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी बोरजवळा शिवारात घटनास्थळावर वाहन क्रमांक एमएच-४६ बीक्यू-२२८७ मधून कापूस बियाण्यांची अनधिकृतपणे विक्री करीत असल्याचे पुढे आले. त्यावेळी गिरी यांनी पिंपळगाव राजा पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. सोबतच नमुने बियाणे तपासणी प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवले. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आता आरोपींवर पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ नुसार कारवाई करण्याबाबत पोलिसांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
बियाणे साठा जप्त, कंपन्यांची नावे अनभिज्ञ तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या वेळी प्रीमिअम कॉटन हायब्रीड सिड्स कंपनीचे कापूस-आशा, विजय सिड्स साखरखेर्डाचे सोयाबीन जेएस-३३५, कंपनीचे नावे नमूद नसलेल्या कापूस एकेएच-०८१, चवळी-केेएस आढळून आली होती. त्यानुसार कारवाईसाठी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.