आठवड्यात दरदिवशी विविध गावांमध्ये आठवडी बाजार भरत असतो. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिक या बाजारात भाजीपाला, कपडे, बांगड्या, सौंदर्यप्रसाधने, चप्पल- बूट, खाद्य पदार्थ तसेच चहा व इत्यादींची दुकाने थाटून रोजगार मिळवतात. या सगळ्या व्यावसायातून त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत असतो; परंतु जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्याच्या दृष्टीने आदेश काढून जानेफळसह जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागील वर्षीसुद्धा कोरोनामुळे संपूर्ण वर्षभर मोठ्या अडचणींचा सामना करीत कसेबसे वर्ष ढकलले गेले असताना या वर्षी परिस्थिती थोडी सुधारण्याची आशा सर्वच जण बाळगून होते; परंतु कोरोना महामारीसारख्या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने चिंतेचेच वातावरण निर्माण झाले आहे.
बाजार बंद असल्याने व्यापारी बांधवांची मोठी गोची होत असून त्यांचा व कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी बांधवांना सुद्धा मोठ्या मेहनतीने पिकविलेला भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे.
बैल बाजारवरही संकट
जानेेेफळ येथे शनिवारी मोठा बैल बाजार भरतो. येथील बैल बाजार तसेच बकरी बाजारही बंद असल्याने शेतकरी वर्गसुत्रा कमालीचा अडचणीत सापडला आहे. एकूणच निर्माण झालेली ही परिस्थिती कधी निवळणार व आठवडी बाजार केव्हा सुरू होणार, याकडे व्यापारी व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण आठवडाभर विविध गावांतील आठवडी बाजारात मसाला विक्रीचे दुकान घेऊन जात असतो; परंतु सध्या कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने घरीच बसून आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून आणलेल्या मालाचे पैसे थकले आहेत. सध्या मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. माझ्यासारख्या अनेक छोट्या व्यापारी बांधवांसमोर सुद्धा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
-शेख इमरान, मसाला विक्रेता
मी शेळीपालन करीत असतो. सध्या काही बोकुड विकून मला आणखी शेळ्या घ्यायच्या आहेत; परंतु सध्या बाजार बंद असल्याने गावात येणारे व्यापारी कमी भावात बोकुड मागत आहेत. तसेच शेळ्यासुद्धा मिळत नाहीत.
-सिद्धार्थ नालेगावकर,
शेळीपालन व्यावसायिक.