लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. परंतु ६ एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी नागरिकांनी या आदेशाचे उल्लंघन केले. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लादले असून, जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत संभ्रमाची स्थिती दिसून आली. काही व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन पाळत आपली दुकाने बंद ठेवली. परंतु अनेक व्यापारऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. काेरोना विषाणू (कोविड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, लागू करण्यात आलेला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात कोविड-१९ चे अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ३० एप्रिल २०२१ पर्यंत विशेष निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ५ एप्रिल रोजी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ५ एप्रिल ते ३० एप्रिल, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत हा सुधारित आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू आहे. या कालावधीत ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, अनावश्यकरीत्या कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय शहरात व गावात फिरू नये,. या व्यतिरिक्त असलेल्या वेळेत म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी व शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू राहील. या कालावधीत कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय, विहित परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी, बाहेर, शहरात व गावात फिरू नये, आठवडा अखेर शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहील. संचारबंदी कालावधीमध्ये वैद्यकीय सेवेसह अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. या आदेशानंतर जिल्ह्यात ६ एप्रिल रोजी व्यापाऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात पाऊल टाकत रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. लॉकडाऊनला अनेकांनी विरोध केला.
आदेशाबाबत संभ्रम; पोलीसांच्या धाकाने दुकाने बदंनागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये या नवीन आदेशाबाबत संभ्रम दिसून येत आहे. अनेकांनी तर पोलीसांच्या धाकाने दुकाने बंद केली. मेहकर येथेही सकाळी व्यापाऱ्यांनी नेहमी प्रमाणे दुकाने उघडली होती. परंतू दुपारी पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्याचे दिसून आले.