मेहकरः संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या कपडा व्यापाऱ्यावर नगरपालिका व पोलीस विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास २० हजार रुपये दंड आकारण्यात आला असून, नगरपालिका व पोलीस विभाग संयुक्तपणे कारवाईची मोहीम राबवित आहे .
कोरोना महामारीमुळे मेहकरमध्ये रुग्णांची संख्या वाढतच आहे. शासनाने सध्या संचारबंदी सुरू केली आहे. या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे शासनाचे कडक आदेश आहेत ;परंतु मेहकरातील काही दुकानदार संबंधित अधिकाऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करून आपली दुकाने चालवित आहे. नगरपालिका व पोलीस विभागाने दररोज शहरात धडक मोहीम सुरू केली आहे.शहरातील मुख्य बाजारपेठ या ठिकाणी हे पथक दररोज फिरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावर कारवाई करीत आहेत तर कोरोनाचा फैलाव होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, शासनाच्या नियमाचे उल्लंघन करू नका असे आवाहन सुद्धा व्यापाऱ्यांना करीत आहेत ; परंतु काही व्यापारी या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव नगरपालिका व पोलीस विभागाने धडक कारवाई मोहिमेचा बडगा सुरू केला आहे. २६ एप्रिल रोजी एका कापड दुकानदाराला १ हजार रुपये दंड तर अन्य दाेन दुकानदारांना १९ हजार ५०० रुपये असा एकूण २० हजार ५०० रुपये दंड ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना चांगला चाप बसला आहे.या मोहिमेत मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे,पोलीस उपनिरीक्षक घुले,उपमुख्याधिकारी रवींद्र वाघमोडे,सुधीर सारोळकर, गिरी, बंडू जंजाळ, जावेद गवळी ,नंदकिशोर आंधळे, शफी अहमद, प्रकाश सोभागे ,पोलीस हेडकॉस्टेबल गणेश लोढे , अशोक मस्के सहभागी झाले होते.