मेहकर : काेराेना संसर्ग वाढत असल्याने नगर पालिका प्रशासनाने विविध उपाययाेजना केल्या आहेत. शहरातील व्यावसायिकांच्या काेराेना चाचण्या करण्यात येणार आहेत. शहरातील व्यावसायिकांनी तातडीने चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नगर पालिकेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी केले आहे.
गतवर्षी २३ मार्च रोजी संपूर्ण जगामध्ये कोविड-१९ महामारीसारख्या रोगाने आगमन केले. या रोगामुळे संपूर्ण भारतात सर्वसामान्य जनतेमध्ये हाहाकार उडाला असून या रोगाचा नायनाट झाल्यासारखे वाटत असतानाच या रोगाने पुन्हा वेगात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हानिहाय वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहेत. मेहकर नगर परिषदेच्या वतीने शहरातील ठोक व किरकोळ व्यापाऱ्यांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कोरोना चाचणीसाठी बूथ लावण्यात आले आहेत. त्यामध्ये शहरातील व्यापारी व सर्वसामान्य जनतेने आपापली कोरोना चाचणी करून घेण्यासाठी मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी आवाहन केले आहे. मेहकरचे तहसीलदार संजय गरकल व मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या उपस्थितीत मेहकर शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी कोरोना चाचणीस प्रारंभ झाला आहे.