दुकाने उघडण्याची केली मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : शहरातील व्यापारी बांधवांनी मंगळवारी एकत्र येत सरकारच्या लॉकडाऊन धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली असून उपासमारी थांबविण्यासाठी दुकाने उघडण्याची परवानगी मागणारे निवेदन तहसीलदार व पालिका मुख्याधिकारी यांना दिले.
या वेळी नगराध्यक्ष सतीश तायडे यांचीही उपस्थिती होती.
सोमवारी संपूर्ण राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर झाले. या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. सिंदखेडराजा शहरातही या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला गेला. मंगळवारी सकाळी ११ वाजता शहरातील शेकडो व्यापारी या विरोधात एकत्र आले. या लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पुढील २५ दिवस व्यापार बंद ठेवावा लागणार असल्याने बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरता येणार नाहीत तर रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण होणार असल्याने लादलेले लॉकडाऊन शिथिल करावे व सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी मागणारे निवेदन दिले.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्यापार सुरू असल्याचा दावा
दरम्यान, पालिका कार्यालयाबाहेर जमलेल्या व्यापाऱ्यांनी देऊळगावराजा, चिखली, शेजारील जालन्यात व्यापारी प्रतिष्ठाने सुरू असल्याचा दावा करून सिंदखेडराजा येथील व्यापाऱ्यांना वेगळा मापदंड लावला जात असल्याचा आरोप अनेक व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्याशी बोलताना केला आहे.
आम्ही वरिष्ठांचे आदेश पाळणार
या संदर्भात बोलताना मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. लॉकडाऊन संदर्भात आलेले आदेश हे संपूर्ण राज्यात लागू असल्याने आपल्या शहरातही कोणी दुकाने उघडणार असतील तर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
तहसीलदार यांनाही दिले निवेदन
या संदर्भात व्यापाऱ्यांनी तहसीलदार सुनील सावंत यांची भेट घेऊन निवेदन दिले व दुकाने उघडण्याची परवानगी मागितली. याबाबत वरिष्ठांना कळविले जाईल. वरिष्ठांकडून जसे आदेश येतील त्याबाबत व्यापाऱ्यांना सूचित केले जाईल, असे सांगून सावंत यांनीही व्यापाऱ्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला.
चौकट
पोलीस बळाचा वापर
व्यापाऱ्यांची गर्दी होत असल्याने पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह तहसीलमध्ये येऊन गर्दी पांगवली व व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा केली.
१: मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करताना व्यापारी.
२: गावातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पालिका कार्यालय गाठले.