चिखली : सहकार क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींना व संकटांना सामोरे जावे लागते, मात्र सहकाराला संस्काराची परंपरा लाभलेली असल्याने नागरी बँका व पतसंस्था या आर्थिक संस्था अत्यंत चांगले काम करीत आहेत, असे मत रा.स्व.संघाचे माजी पश्चिम क्षेत्र प्रचारक तथा भाजपा महाराष्ट्र राज्याचे माजी संघटनमंत्री प्रा.रवींद्र भुसारी यांची चिखली येथे व्यक्त केले.
बुलडाणा जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन व सहकार भारती विदर्भ प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सहकारी बँकांचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी ३१ जानेवारी रोजी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा.भुसारी बोलत होते. स्थानिक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बुलडाणा जिल्हा नागरी सहकारी बँकर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश गुप्त व सहकार भारती विदर्भ प्रदेश अध्यक्ष आशिष चौबिसा यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेला अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील एकूण ९ बँकांचे अध्यक्ष, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रा.भुसारी यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेत रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी, महेश देशपांडे व योगेश परळकर, अशोक नाईक संचालक गॅलेक्सी इन्मा प्रा.लि.पुणे आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. बँकेचे संचालकांनी कोणते काम करावे किंवा करू नये याबाबत रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत यावर सकारात्मक मार्गदर्शन व चर्चा होऊन कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यशाळेच्या समारोपीय सत्राला मेहकर जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.