लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातून जाणाऱ्या खामगाव-नांदुरा रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे खामगाव शहरातील वाहतूक कोडींत दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसून येते. गुरूवारी बाजाराच्या दिवशी तसेच शुक्रवारी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. याकडे वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
खामगाव शहरातून जाणाºया रस्त्याच्या विस्तारीकरणातंर्गत नाली बांधकाम आणि रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे. या रस्त्यावरील वृक्षाची कटाई देखील केली जात आहे. ऐन गर्दीच्यावेळी वृक्ष कटाई करण्यात येत असल्यामुळे सामान्य नागरिकांसोबतच वाहन धारकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्याचवेळी नाली बांधकामासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. खोदकामामुळे मातीचे ढिगारेही या रस्त्यावर असून, काही अतिक्रमकांनी रस्त्याकडील बाजूने चहाटपरी तसेच इतर खाद्य वस्तुंची दुकाने थाटली आहेत. परिणामी, रस्ता अरुंद होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याकडे पोलिसांसोबतच संबंधीत विभागाचे दुर्लक्ष आहे.
नादुरूस्त बसमुळे वाहनांच्या रांगा!
शहरातील मुख्य मार्गावर शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एक बस नादुरूस्त झाली. ऐन गर्दीच्यावेळी ही बस बंद पडल्याने, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीत चांगलीच भर पडली.