लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : रेशनचा माल दुकानांपर्यंत न पोहचविता थेट काळ्या बाजारात विक्री होत असल्याच्या घटना जानेवारी महिन्यात शेगाव येथे उघडकीस आल्या. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी चौकशीअंती वाहतूक कंत्राटदारावर तत्काळ पोलिसात तक्रार देऊन गुन्हा नोंदविण्यात यावा, असे आदेश दिलेले असताना या आदेशाला शेगाव पुरवठा विभागाकडून केराची टोपली दाखविल्या जात असल्याची बाब समोर येत आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात द्वारपोच योजनेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे उघडकीस आलेले आहे. यामध्ये शेगाव शहरातील रेशनच्या मालाची अफरातफर अनेक वेळा उघडकीस आली आहे. मागील २५ जानेवारीला द्वारपोच योजनेंतर्गत रेशन धान्याचे ३५0 कट्टे तांदूळ व गहू संबंधित रेशन दुकानावर न पोहोचविता शेगाव येथील एक गोदामावर उतरविण्यात आला. पुरवठा विभागाने या ठिकाणी धाड टाकून सदर माल ताब्यात घेतला व या प्रकरणी इतर रेशन माफियांना सोडून फक्त रेशन दुकानदार गजानन हरिभाऊ नीले यांना बळीचा बकरा बनवून त्यांच्यावरच ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.वास्तविक पाहता आपल्या करारनाम्याचा भंग केल्यामुळे वाह तूक ठेकेदारावरसुद्धा गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी झाडे यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर त्यांनी याची चौकशी लावली. त्यामध्ये आदेश दिले की, अप्पर जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी आपल्या अहवालात वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनी अमरावतीने शासनासोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व श र्तीचा भंग केला असून, दोषी असल्याचे नमूद केले आहे.
पुरवठा अधिकारी वट्टे यांच्यावर जबाबदारीआठवडाभराचा कालावधी उलटला तरीही अद्याप पावेतो जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कंत्राटदारासोबत साठगाठ केल्या गेल्यावर तर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही ना, अशी शंका नागरिक उपस्थित करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी खामगावचे पुरवठा अधिकारी वट्टे यांच्याकडे देण्यात आली आहे; मात्र बुधवारी रात्रीपर्यंत हे अधिकारी पोलीस स्टेशनला पोहचलेले नव्हते. या बाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता काही कामानिमित्त बाहेर जावे लागत असल्यामुळे गुन्हा दाखल करता आला नसल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.