बुलडाणा: विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय माहमार्गावरील तीन पर्यायी पुल बुलडाणा, जालना जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे अजिंठा-बुलडाणा मार्गावरील वाहूक ठप्प झाली आहे. परिणामी सीमावर्ती भागातून अकोला, अमरावती आणि नागपूरला नेण्यात येणाºया भाजीपाल्याची आवकच थांबली आहे.बुलडाणा-अजिंठा या मार्गाचे गेल्या अडीच वर्षापासून काम सुरू आहे. या मार्गावर जालना जिल्ह्यातील धावडा व वाढोणा, जाळीचा देव या भागात गुरुवार, शुक्रवार दरम्यान जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धावड्या नजीकचा एक व वाढोणा येथील दोन नद्यांना पूर आल्याने आणखी एक असे तीन पूल वाहून गेले. त्यामुळे जवळपास १२ जून पासून बुलडाणा-अजिंठा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा फटका अजिंठा, शिवना, धावडा परिसरातील शेतकऱ्यांना बसला असून त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील या भागातून पालक, मेथीसह मिरची व अन्य भाजीपाल हा मोठ्या प्रमाणावर बुलडाणा, खामगाव, अमरावती व नागपूर येथे जातो. दररोज भाजीपाला घेवून वाहने या मार्गावरून नागपूरच्या दिशेने जातात. त्यामुळे विदर्भात येणाºया भाजीपाल्याची आवक रोडावली आहे. दुसरीकडे धाड-बुलडाणा मार्गावरील कोलवड नजीकचा पैनगंगा नदीवरील पर्यायी पुलही गेल्या तीन दिवसापूर्वी वाहून गेला आहे. त्यामुळे धाड, माहोरा आणि पारध परिसरातूनही मेथीची आवक घटली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ई अंतर्गत बुलडाणा-अजिंठा मार्ग येतो. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचे सीमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.
बुलडाणा-अजिंठा महामार्गावरील वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 1:04 PM