मलकापूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी १ वाजता मलकापूर येथील खान्देश सीमेवर माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात "रास्ता रोको आंदोलन" करण्यात आले. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रीय महामार्ग १ तासापर्यंत रोखून धरला.
यावेळी विदर्भातील शेवटचे गावं रणथम चिखली खान्देश सीमेवर "विदर्भ राज्यात आपले सहर्ष स्वागत आहे" या आशयाचे फलक लावण्यात आले. लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भाचे राज्य मिळवूनच राहू, अशी सर्वांनी शपथ घेतली. खान्देश सीमा संपली, आता विदर्भाचे युद्ध मराठवाड्याच्या सीमेवर २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी रास्ता रोको आंदोलन देऊळगाव कुंडपाळ (विदर्भ मराठवाडा सीमा) ता. लोणार येथे होईल. आंदोलनामध्ये विदर्भ प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, जिल्हाध्यक्ष अॅड. सुरेश वानखेडे, जिल्हा समन्वयक दामोदर शर्मा, तेजराव मुंडे, रंजीत डोसे पाटील, शरद पोफळे, प्रा. पुंडलिक हिवाळे, देवीदास कणखर, एकनाथ पाटील, समाधान कणखर, प्रा. राम बरोटे, प्रा. रामदास सिंगणे, नामदेव जाधव, मुरलीधर महाराज येवले, शाहीर खान्देभराड, रमेशसिंग चौहान, राजेंद्र आगरकर, सादिकभाई देशमुख, पांडुरंग बिजवे, विकास सोळंखे यांच्यासह मलकापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनासाठी दामोदर शर्मा व रंजीत डोसे पाटील यांनी प्रयत्न केले.