बुलढाणा : जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑन काॅल ड्युटीवर कार्यरत असलेल्या भूलतज्ज्ञ डाॅक्टराने प्रशिक्षणासाठी आलेल्या एका डाॅक्टर तरुणीची छेड काढल्याची घटना ११ मे राेजी रात्री ११़ ३० वाजता घडली हाेती. या प्रकरणी डाॅक्टर तरुणीच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पाेलिसांनी आराेपी भूलतज्ज्ञ डाॅक्टर विरुद्ध २९ मे राेजी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन तीन महिने प्रशिक्षण घ्यावे लागते. याकरिता बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर येत असतात व त्यामध्ये तरुणींचा देखील समावेश असतो. बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षणासाठी आलेली एका डॉक्टर तरुणीसाेबत ११ मेच्या रात्री धक्कादायक घटना घडली. स्त्री रुग्णालयात एनआरएचएम अंतर्गत ऑन कॉल तत्त्वावर कार्यरत भूलतज्ज्ञ डॉ.अविनाश सोळंके याने रात्री ड्युटीवर असलेल्या तरुणीला व्हाॅट्सॲपवर मेसेज करून रुग्णालय बाहेर बोलावले.
तरुणी बाहेर आली असता तिला कारमध्ये बसण्याचे सांगितले. परंतु, फिर्यादीने काय काम आहे सर? असे विचारले असता आरोपी म्हणाला की, तू मला आवडते, तुझ्या सोबत लग्न करायचे आहे, असे बोलून तिचा विनयभंग केला. डाॅक्टर तरुणीच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी आरोपी भूलतज्ज्ञ डॉक्टर अविनाश सोळंके विरुद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.