जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ हजार २५५ गावांचे जल जीवन मिशनअंतर्गतचे कृती आराखडे तयार करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हाती घेतलेली आहे. त्याअंतर्गत ७ ऑगस्टपर्यंत हा पंधरवडा राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने ग्रामस्तरावर गाव कृती आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत गावांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेला यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. यात १३ ही तालुक्यांतील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे दोन सदस्य यांचा यात समावेश होता. यामध्ये पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक तायडे, कार्यकारी अभियंता राहुल जाधव, शाखा अभियंता चंद्रशेखर पिंपरकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील मूल्यमापन सल्लागार प्रशांतगिरी, मनुष्यबळ विकास सल्लागार मनीषा शेजव, पाणी गुणवत्ता सल्लाकार किरण शेजोळ, वैभव ढांगे यांनी मार्गदर्शन केले.
--उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन--
ग्रामपातळीवर घरपरत्वे शुद्ध पाणी मिळावे यादृष्टीने हे अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या या पंधरवड्यात ग्रामस्तरावरून सक्रिय सहभाग घेण्यात येऊन अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण केले जावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमल बुधवत यांनी केले आहे.