चिखली : उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या सही-शिक्क्याचे बनावट परवानगी आदेश सादर करून शेतजमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे दस्त सादर करणाऱ्या दिवठाणा येथील तिघे व चिखली येथील दोघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध सखोल चौकशी अंती नायब तहसीलदार वीर यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात ५ गुंठे जमिनीचा तुकडा पडत नसल्यास त्या व्यवहारासाठी उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांची परवानगी आवश्यक असते. मात्र, तालुक्यातील दिवठाणा येथील गट नं. ६८ मधील ०.४७ हेक्टर आर जमिनीपैकी ०.०२ हे. आर जमीन गोठ्याकरिता म्हणून प्रणिता सुमंता मोरे लिहून घेणार व तेजराव कोंडू मोरे लिहून देणार दोघे रा. दिवठाणा यांनी ३११४/२०२० क्रमांकाच्या दस्ताद्वारे २३ जुलै २०२० ला केलेल्या खरेदी व-क्री व्यवहारात उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयाचे आरटीएस ५९/४६/२०२० क्रमांकाचे १६ जून २०२० रोजीचे बनावट दस्त/आदेश सादर करून खरेदी-विक्रीचा व्यवहार केला आहे. यासह दिवठाणा येथीलच गट नं. ६८ मधील ०.४७ हे. आर जमिनीपैकी ०.०१ हे आर शेतजमीन धनंजय नामदेव मोरे लिहून घेणार व तेजराव कोंडू मोरे लिहून देणार दोघे रा. दिवठाणा यांनीसुद्धा ३११३/२०२० क्रमांकाच्या दस्ताद्वारे २३ जुलै २०२० ला केलेल्या खरेदी-विक्री व्यवहारालादेखील उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयाचे आरटीएस ५९/४४/२०२० क्रमांकाचे १६ जून २०२० रोजीचे बनावट दस्त/आदेश सादर करून खरेदी-विक्रीचा व्यवहार केला आहे. ही बाब फेरफारच्या नोंदी घेताना तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तहसीलदारांना माहिती दिली होती. यावरून तहसीलदारांनी सदर प्रकरणी चौकशी समिती नेमून सखोल चौकशी केली असता संबंधित शेतजमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या खोट्या सही-शिक्क्याचा वापर करून परवानगी आदेश सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. तथापि याकामी दिवठाणा येथील उपरोक्त तीन लिहून घेणार व देणारांना चिखली येथील नितीन वसंतराव मेहेत्रे व अमोल प्रल्हाद जाधव यांनी मदत केली असल्याचे आढळून आल्याने चौकशीअंती नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी एच.डी. वीर यांनी चौकशी समितीच्या अहवालासह चिखली पोलिसांत तक्रार केली आहे. चिखली पोलिसांनी प्रणिता सुमंता मोरे, तेजराव कोंडू मोरे, धनंजय नामदेव मोरे तिघे रा. दिवठाणा व नितीन वसंतराव मेहत्रे, अमोल प्रल्हाद जाधव दोघे रा. चिखली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.