बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून ज्वलनशील पदार्थ अथवा वस्तुची वाहतूक करू नये, असे आदेश असताना बुलडाणा आगाराच्या बुलडाणा - पुणे बसमधून सिलिंडरची वाहतूक करताना औरंगाबाद येथील तपासणी पथकाने पकडले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सिलिंडर जप्त करून बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. बुलडाणा आगाराची बस क्र. १८३१ ही सकाळी ७.१५ वाजता बुलडाणा बसस्थानकाहून पुणेसाठी निघाली. या बसवर चालक बी.आर. मेढे तर वाहक आर.व्ही. जाधव होते. बस औरंगाबाद बसस्थानकावर गेल्यानंतर तेथील तपासणी पथकाने गाडीची झाडाझडती घेतली असता चालकाच्या कॅबीनमध्ये घरगुती वापराचे गॅस सिलिंडर आढळून आले, ही बाब लक्षात येताच तपासणी पथकाने एस.टी.च्या वरिष्ठ अधिकार्यांना बोलावून पंचनामा करून सिलिंडर जप्त केले, तर बसचालक बी.आर.मेढे यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन बस पुण्यासाठी रवाना केली. यासंदर्भाची माहिती बुलडाणा आगारालाही देण्यात आली.
एसटीतून सिलिंडरची वाहतूक
By admin | Updated: December 11, 2014 01:24 IST