लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव बढे : परिसरात ३ जून रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक घरांवरची पत्रे उडाली, तर रोहिणखेड येथील एक महिला वादळी वाऱ्यामुळे जखमी झाली. विजेचा प्रचंड कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका धामणगाव बढे, ब्राम्हंदा, रोहिणखेड, पोफळी, सारोळा मारोतीसह अनेक गावांना बसला. वाऱ्यामुळे या गावातील अनेक घरांवरील पत्रे उडाली. धामणगाव बढे-पिंप्रीगवळी रस्त्यावर पोफळीजवळ अनेक मोठी झाडे रस्त्यावर पडली. त्यामुळे बराच वेळ या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. धामणगाव बढे येथील सदानंद दराखे यांचे जेसीबी मशीन यावेळी पिंप्रीगवळीकडून येत असल्यामुळे जेसीबीने अनेक झाडे बाजूला सारत रस्ता मोकळा करून दिला. वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस सुरू होताच लोकांची तारांबळ उडाली. अनेक गावातील घरांवरचे टिन उडाले. यामध्ये रोहिणखेड येथील एक महिला जखमी झाली. त्या महिलेला उपचारासाठी बुलडाणा येथे पाठविण्यात आले. झाडांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक मोठे वृक्ष कोलमडून पडले आहेत. फक्त एक तास झालेल्या पावसात शेतात पाणी तुंबले तर अनेक शेताचे बांध तुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, तर पोफळी येथे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. इसोली : परिसरात गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून, सदर पावसामध्ये शिवाजी हायस्कूल शाळेची पत्रे उडाली तर झाडे उन्मळून पडली असून, गारपीट-वादळी वाऱ्यासह पावसामध्ये जीवितहानी झाली नाही. ३ जून रोजी दुपारी ३ वाजेला ढगाळी वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. तर वादळी वाऱ्याने शिवाजी हायस्कूलची पत्रे उडाली असून, विजेचे तार तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे; मात्र सदर पावसाने दमदार हजेरी लावल्याने आता शेतकरी वर्ग हा कामाला सुरुवात करणार असून, मशागतीची कामे जोरात सरू आहेत.
झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत
By admin | Published: June 04, 2017 5:18 AM