मराठवाड्यातील मंठा तालुक्यातील कानडी, उसवद, लिंबखेडा, टाकळखोपा, दुधा, वझर सरकटे, तर विदर्भातील सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, साठेगाव, तढेगाव या वाळूघाटाचा लिलाव शासनाने केला आहे. या दोन्ही तालुक्यांतील वाळू वाहतूक ही लोणार तालुक्यात अवैधरीत्या होत आहे. रात्रंदिवस वाळू वाहतूक करणारे टिप्पर लाेणार तालुक्यात धावत आहेत. लोणार शहरात बायपासवर महसूल विभागाने चेक पोस्ट लावली खरी; पण रात्री या चेक पोस्टवर कुणीच नसते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक तालुक्यात होत आहे. एकाच रॉयल्टीच्या पावतीवर ही वाहतूक होत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात होत आहे.
हीच परिस्थिती तालुक्यातील बिबी मंडळात आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ह्या सर्रासपणे विनारॉयल्टी बिबी परिसरात आहे. बिबी मंडळात तर महसूल विभागाची एकही चेक पोस्ट नाही. त्यामुळे वाळू वाहतूक करणारे बिनधास्त रात्रंदिवस वाळूची वाहतूक करत आहे. भरधाव जाणाऱ्या टिप्परमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. वाळूची वाहतूक करणाऱ्या काही गाड्यांवर तर नंबर प्लेटच नाही. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून वाळूची वाहतूक होत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
लाेणार तालुक्यात माेठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक हाेत असताना त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे. एकाच राॅयल्टीवर दिवसभर वाहतूक करण्यात येत आहे. रेतीचे दरही माेठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे. वाळूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.